अमरावती- कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यात सर्वत्र किमान तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. तसेच राज्यात अवकाळी पावसाचाही शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली होती. त्यानुसार आज अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी हंगामातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हरभरा पिकाचे नुकसान-
विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या वरुड तालुक्यातील सांवगी मुसळखेडासह अनेक भागात गारपीट झाली. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या रब्बी हंगामातील हरभरा पीक काढणीला आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी हरभरा शेतात ठेवला आहे. परंतु आज सकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचा तोंडचा घास हिरावला गेला आहे.
आधीच यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि बोंडअळीमुळे कापूस आणि सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांची मदारी ही रब्बी हंगामातील हरभरा व गहू पिकावर होती, परंतु आता झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा पाय अधिकच खोलात गेला आहे.