अमरावती- जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात पेढी नदीच्या काठावर वसलेल्या सावरखेड गावातील जिल्हा परिषद शाळेची अवस्था दयनीय झाली आहे. वर्गखोलीत छतावरून माती पडते. पावसाळ्यात शाळेला गळती लागते. शाळेच्या इमारतीचा पाया खचला आहे. भिंती आणि छताला तडे गेले आहेत. अशा कठीण परिस्थितीत अगदी जीव मुठीत धरून गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
हेही वाचा- तरुणावर अनैसर्गिक बलात्कार करणाऱ्या चार आरोपींना अटक
सावरखेड हे गाव पेढी नदीच्या काठावर वसले असून या गावासह लगतचा परिसर निम्न पेढी प्रकल्पात समाविष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गाव प्रकल्पात उद्ध्वस्त होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी लढा उभारला. मात्र, जिल्हा परिषदेने हे गाव बुडीत क्षेत्रात जाणार असल्याने गावातील पूर्व माध्यमिक शाळेकडे दुर्लक्ष केले आहे. इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या या शाळेत 48 विद्यार्थी आहेत. सात वर्गांना शिकवण्यासाठी शाळेत तीन शिक्षिका आहेत. एका खोलीतच दोन-तीन वर्गातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी शिकवले जाते.
या शाळेच्या इमारतीचा पाया भुसभुशीत होऊन खचला आहे. भिंतींना तडे गेले असून विद्यार्थ्यांनी आपला वर्ग सुंदर दिसावा यासाठी स्वतः घरून वृत्तपत्र आणून शाळेच्या भिंतीचे ठिगळ लपविण्याचा प्रयत्न केला आहे. शाळेच्या इमारतीच्या छताला तडे गेले असून त्या वरची माती सतत खाली पडत असते. पोषण आहाराकरिता ज्या ठिकाणी धान्य ठेवण्यात आले आहे त्या खोलीतील भिंतींना मोठे छिद्र पडले आहे. शाळेच्या इमारतीची दुरावस्था पाहता याठिकाणी दुर्दैवी घटना घडण्याची भीती विद्यार्थ्यांच्या पालकांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली. गाव बुडीत क्षेत्रात असल्याचे कारण सांगून जिल्हा परिषदेने या शाळेच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष केले आहे. 2016 पासून गावातील गरीब विद्यार्थ्यांच्या शाळेचा कोणीही वाली नाही, अशी विदारक परिस्थिती असल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करतात.