अमरावती - जिल्ह्यात कालपासून (शनिवार) लसीकरण सुरू झाले. लसीकरणासाठी पाच केंद्रे निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा सामान्य रूग्णालय, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय, अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय या पाच केंद्रांवर प्रत्येकी 100 लाभार्थ्यांप्रमाणे 500 लाभार्थ्यांना लस दिली गेली.
तिवसा ग्रामीण रुग्णालयातील सातरगाव येथील महेश भोगे या आरोग्य कर्मचाऱ्याला सर्वात अगोदर कोरोनाची लस देण्यात आली. लस घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवला नसल्याचे त्यांनी सांगितले. काल लस दिलेल्या लाभार्थ्यांना 28 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. या लाभार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 16 हजार 262 हेल्थ केअर वर्करचे लसीकरण होणार आहे. जिल्ह्यात 17 हजार लसींचा डोस प्राप्त झाले होते.
जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम -
पंतप्रधान मोदींच्या हस्ते काल (१६ जानेवारी)पासून देशभरात कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली आहे. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असणार आहे. त्यामुळे पोलीओ लसीकरण कार्यक्रमही ३१ जानेवारीला पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोना लसीकरणासाठी देशभरात २ हजार ९३४ बुथ सज्ज ठेवण्यात आले होते. सुमारे ३ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले.