अमरावती - कोरोनामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांपुढे नवीन संकट उभे ठाकले आहे. सात दिवसांपूर्वी सुरू झालेल्या अमरावती शहरालगत असलेल्या दोन ठिकाणच्या पणन महासंघाच्या कापूस खरेदीला उद्यापासून पुन्हा तात्पुरता ब्रेक लागणार असल्याने आता पुन्हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.
देशात सध्या कोरोनाने हाहाकार माजवल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाला आधीच भाव नाही त्यात मागील दीड ते बंद असलेल्या शासकीय कापूस खरेदीला २१ एप्रिल पासून प्रारंभ झाला होता. अनेक शेतकऱ्यांनी कापसाच्या नोंदणी केल्या. तिथून काही दिवसात प्रत्यक्षात कापूस खरेदी सुरू झाली होती. दरम्यान, अमरावती शहरात ३० तारखेपासून कोरोना रुग्णांची झपाट्याने होत असलेली वाढ लक्षात घेता, अमरावती नजीकच्या कामुंजा येथील श्री अॅग्रो सर्व्हिसेस व रेवसा गंगा फायबर या दोन्ही कापूस खरेदी केंद्रावर काम करण्यासाठी येणारे मजूर हे प्रतिबंधक असलेल्या अमरावती मधील रेड झोन विभातूनच येत असल्याने कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना कामावर बोलवणे योग्य नसल्याने उद्यापासून या दोन्ही कापूस खरेदी केंद्रावरील कापूस खरेदी ही तात्पुरती बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. एका महिन्यावर पेरणीचा कालावधी आला असताना कापूसच विकला गेला नाही तर पेरणी तरी कशी असा प्रश्न या केंद्रांत नोंद करणाऱ्या शेतकऱ्यांसमो उपस्थित झाला आहे.
सध्या अमरावती ग्रामीण भागात सात ठिकाणी सुद्धा शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू आहेत. मात्र, तेथील कापूस खरेदी ही सुरच राहणार आहे.
हेही वाचा - अमरावती : दोन लेकरांसह दाम्पत्याची उन्हात पायपीट, हैदरबादहून कानपूरकडे प्रवास