अमरावती- आधीच सातत्याने संकटाच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या जीवावर आता नवे संकट उठले आहे. मागील पंधरा दिवसांपासून पश्चिम विदर्भातील लाखो हेक्टर कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केल्याने कापसाचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पूर्वीच खोडकीड व परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांचे 'तेल काढल्यानंतर' आता कपाशीवरील बोंडअळीने देखील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास गिळला आहे. पंधरा दिवसापूर्वी शेतामध्ये जोरदारपणे डोलणारी कपाशी आज बोंड अळीच्या विळख्यात सापडली असल्याने हिरव्यागार दिसणाऱ्या कपाशीच्या बोंडामध्ये गुलाबी बोंडअळी असल्याने झाडालाच बोंडे सडून जात आहेत.
सोयाबीन पाठोपाठ कापूसही गेला कामातून
यावर्षी पश्चिम विदर्भामध्ये ७ लाख ५७ हजार हेक्टरवर कापसाची तर ९ लाख ६६ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करणारे पीक म्हणून सोयाबीनवर शेतकऱ्यांची मदार असते; परंतु त्या पिकानेही यंदा दगा दिल्याने आता शेतकऱ्यांची भिस्त ही पांढरं सोन असलेल्या कापसावर होती. पण हेच सोनं बोंडअळीमुळे काळवंडल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरही पाणी फिरले आहे. आधी परतीचा पाऊस आणि त्यात आता गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने कपाशीला असलेल्या बोंडांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त बोंडे बाधीत झालीत. त्यामुळे बोंडातून कापूसच बाहेर येत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट होणार आहे. यावर्षी खरिपाच्या सुरुवातीपासून पावसाने शेतकऱ्यांचा पिच्छा सोडला नाही. सुरुवातीला सुखदायक वाटणारा पाऊस मात्र शेवटी शेतकऱ्यांसाठी मारक ठरला आहे.
मागील वर्षीपेक्षा यंदा कमी उत्पादन -
अमरावती जिल्ह्यातील रघुनाथपूर गावातील कापूस उत्पादक शेतकरी सचिन बायस्कर सांगतात लॉकडाऊनमुळे माझी नोकरी गेली. त्यामुळे मी शेतीकडे वळलो. मागीलवर्षी एक हेक्टर कपाशीवर त्यांना जवळपास वीसपेक्षा जास्त क्विंटल कापसाचे उत्पादन झाले होते; परंतु यावर्षी कापूस वेचणीच्या सुरुवातीलाच बोंडअळीने मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव केल्याने आता दहा ते बारा क्विंटल कापूसही होणार नसल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. मागील वर्षी एका हेक्टरमध्ये त्यांना पहिल्या वेचणीला १० क्विंटल कापूस झाला होता. यंदा मात्र तो केवळ ६ क्विंटल झाला आहे.