अमरावती - मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या मेहरीयम या ग्रामपंचायतीला 12 ऑगस्ट 2018 साली पाणी फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला होता. या पुरस्कारात मिळालेल्या रोख पंधरा लाख रुपयांचा गैरवापर केल्याचा प्रकार समोर आला आहे. यासाठी ग्रामपंचायत जबाबदार असून, संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या पूजा येवले-नियाज यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे केली आहे.
मेहरीयम ग्रामपंचायतीला 2018 मध्ये पाणी फाउंडेशनच्या वतीने 15 लाख रुपये रोख पुरस्कार प्राप्त झाला होता. या पुरस्काराच्या रकमेतून ग्रामपंचायतीने कोणतीही सभा न घेता तसेच कोणाचीही मान्यता न घेता चार पाईपलाईनच्या कामासाठी संबंधित रक्कम खर्च केली. तसेच याबद्दल कोणातीही निविदा न काढता 15 लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
हा प्रकार अतिशय गंभीर असून, पाणीपुरवठ्यासाठी टाकण्यात आलेल्या पाईपलाईनमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्या पूजा येवले यांनी केला आहे. यासंदर्भात आज मेहरीयम गावातील ग्रामस्थांसह त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे केली आहे.