अमरावती - जिल्ह्यातील तिवसा येथील सहायक निबंधक कार्यालयात ५८ लाखांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोषी असलेल्या सहायक निबंधक अधिकारी 'विजय भास्कर लेंडे' यांना विभागीय सहनिबंधकांनी बुधवारी तात्काळ निलंबित केले होते. शनिवारी रात्री या प्रकरणी तिवसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्या नंतर विजय लेंडे यांना पोलिसांनी अटक केले आहे.
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 'डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने' करिता निधी उपलब्ध करण्यात आला होता. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व गावपातळीवरच्या सोसायट्यांना पीक कर्जापोटी बसणाऱ्या व्याजाच्या भुर्दंडाचा मोबदला मिळावा यासाठी 'डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना' आहे. या योजनेतील ५८ लाखांच्या निधीचा अपहार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. तिवसा सहायक निबंधक कार्यालयातील 'विजय भास्कर लेंडे' यांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर नंतर विजय लेंडे यांना पोलिसांनी अटक केले आहे. या प्रकरणात आणखी काही बडे अधिकारी सहभागी असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या प्रकरणामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.