अमरावती - कोरोना चाचणी अहवाल तातडीने प्राप्त व्हावा, यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. शासनाचे आदेश येताच ही लॅब कार्यान्वीत होणार आहे. या प्रयोगशाळेत अवघ्या तासाभरात एकूण 12 स्वॅबचे अहवाल प्राप्त होणार आहे.
कोरोनाने सर्वत्र थैमान घातला असताना विदर्भात अमरावतीसह अनेक जिल्ह्यातील संभाव्य कोरोना रुग्णांचे थ्रोट स्वॅब नागपूर येथील एम्स रुग्णालयात पाठविण्यात येत आहेत. यामुळे अहवाल प्राप्त होण्यास बराच उशीर होतो आहे. त्यामुळे विभागीय शहर असणाऱ्या अमरावती शहरात संत गाडगेबाबा अमरावती विद्यपीठात प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. विद्यापीठात उपलब्ध असणारी मशिनरीचा वापर होण्यासाठी ही प्रयोगशाळा अत्यंत महत्वाची ठरणार आहे. प्राध्यापक डॉ. प्रशांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात नियुक्त चमू या प्रयोगशाळेत सज्ज आहे.
इंडियन कॉन्सिल मेडिकल रिसर्च या प्रयोगशाळेला ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहे. बायोपोस्ट कॅबिनेट आणि आर्टिपीसीआर या दोन्ही मशीनची चाचपणी करण्यात आली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी या प्रयोगशाळेबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे प्रस्ताव सादर केल्यावर जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी या प्रयोगशाळेसाठी शासनाकडे पाठपुरावा केला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित अर्थसहाय्य मंजूर केले. आता ही प्रयोगशाळा कार्यान्वित होण्यासाठी शासनाच्या आदेशाची वाट आहे.