अमरावती - खासदार नवनीत राणा यांना अचानकपणे श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना नागपूरच्या ओकहर्ट रुग्णालयामध्ये रात्री उशिरा दाखल करण्यात आले. राणा यांच्यावर अमरावती येथे त्यांच्या राहत्या घरी उपचार सुरू होते. तर ६ दिवसाआधी नवनीत राणा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
याआधी नवनीत राणा यांच्या कुटुंबातील त्यांचे सासू, सासरे, दोन्ही मुले व पती आमदार रवी राणा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचे सासू, सासर्यांनी कोरोनावर मात केली असून त्यांना 24 दिवस विलगीकरणत राहण्याचा सल्ला दिला आहे. आता नवनीत राणा ह्या लवकर बरे व्हा यासाठी सर्वत्र प्राथना केली जात आहे.
आमदार रवी राणा यांचे वडील गंगाधर राणा यांचा कोरोना अहवाल २ ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य, कार्यकर्ते अशा जवळपास ५० ते ६० जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. सुरुवातीला रवी राणा यांच्या वडिलांनंतर आई, बहीण, भावोजी, भाचा, पुतण्या अशा एकूण सात सदस्यांना लागण झाल्याचे चाचणी अहवालात समोर आले.
त्यानंतर खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या दोन्ही मुलांनाही संसर्ग झाल्याचे समजले. आमदार रवी राणाही कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला.