अमरावती - मागीलवर्षी होळीनंतर कोरोनाने थैमान घातले होते. यावर्षीची होळी कोरोनाच्या सावटातच साजरी होत आहे. रंगांचा सण असणाऱ्या होळीला गाठीचे महत्वही अनन्यसाधारण आहे. असे असले तरी यावर्षी गाठीचा व्यवसाय अपेक्षेप्रमाणे बहरला नसून होळीची परंपरा म्हणून ग्राहक नावापुरती गाठी खरेदी करीत आल्याचे चित्र शहरातील बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.
१०० किलोच्या जागी ५० किलोच्या गाठ्या
'होळी सण जवळ येताच आम्ही गाठी बनवायला सुरुवात करतो. दरवर्षी १०० किलो गाठ्या आम्ही तयार करून विकत असतो. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे तसेच सायंकाळी बाजारपेठ बंद होते. त्यामुळे यावर्षी केवळ ५० किलो गाठी तयार कराव्या लागल्या.' अशी भावना गाठी व्यावसायिकांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केली आहे.
उत्तरप्रदेशातील कारागीर
शहरातील गांधी चौक परिसरात उमरवैश्य कुटुंबाचे चार पिढ्यांपासून बत्तासे, गाठ्यांचा व्यवसाय आहे. होळी आणि त्यानंतर येणाऱ्या गुढी पाडवा सणानिमित्त मोठ्या प्रमाणात गाठ्यांची विक्री होते. या गाठ्या बनविण्यासाठी अमरावतीत कारागीर नसल्याने दरवर्षी थेट उत्तरप्रदेशातून कारागीर आणावे लागतात. यावर्षी दोन कारागीर आले असून त्यांच्या हाताखाली १० काम करणाऱ्या महिला अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथून आणाव्या लागल्याचे गाठी व्यावसायिक सांगतात.
दरवर्षी महाशिवरात्री पूर्वी सुरू होते काम
होळी निमित्ताने दरवर्षी महाशिवरात्री पूर्वी गाठी बनविण्याचे काम सुरू होते. यावर्षी कोरोना आणि लॉकडाऊन पाहता पहिल्यांदा महाशिवरात्री नंतर कारागीर बोलावण्यात आले.
हेही वाचा-मेळघाटात पारंपरिक होळी सणाला प्रारंभ