अमरावती - महाराष्ट्राचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या शेतातील विहिरीचे पाणी दूषित झाले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नांदगाव पेठ एमआयडीसी लगत कृषीमंत्र्यांसह अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी खराब झाले आहेत. त्यामुळे या सर्व शेतातील संत्रा तसेच इतर पीक दूषित पाण्यामुळे नष्ट झाले आहेत.
अमरावतीच्या नांदगावपेठ एमआयडीसीत असणाऱ्या सर्व कारखान्यांमधील दूषित पाणी एसएमएस या खाजगी जलशुद्धीकरण केंद्रात पाठविले जाते. याठिकाणी दिवसाला १६ लाख लिटर दूषित पाणी येते. यापैकी केवळ ८ हजार लिटर पाण्याचे रिसायकलिंग केले जाते. तर उर्वरित ८ हजार लिटर दूषित पाणी फेकून दिले जाते.
गत ३ वर्षापासून दरररोज ८ हजार लिटर दूषित पाणी जमिनीत मुरत असताना या पाण्याचा झरा लगतच्या शेतातील विहिरींमध्येही पोहोचला आहे. या विहिरींमध्ये कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या विहिराचाही समावेश आहे. खुद्द कृषीमंत्र्यांनी याबाबत ५ जुलैला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे तक्रारही दिली आहे.
दरम्यान, आज अमरावतीचे माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते अनंत गुढे हे प्रदूषण मंडळ आणि कृषी अधिकाऱ्यांसह कृषीमंत्र्यांच्या शेतात पोहोचले. यावेळी कृषीमंत्र्यांच्या विहिरीतील पाणी लाल-काळे झालेले आढळून आले. या पाण्यामुळे अंगाला खाज सुटते, अशा तक्रारी या भागातील शेतकऱ्यांनी यावेळी केल्या. दूषित पाण्यामुळे शेतात पीक येऊ शकत नाही, झाडांची फळे गळून पडतात तसेच झाडे सुकतात, असा अहवाल कृषी विभागानेही दिला असल्याचे यावेळी समोर आले.
कृषीमंत्र्यांच्या शेतासोबतच लगतच्या शेतातील विहिरींचीही पाहणी अनंत गुढे यांनी केली. एसएमएस कंपनीने आपल्या जलशुद्धीकरण केंद्राचे पाणी असे जमिनीत सोडून देण्याचा प्रकार त्वरित बंद केला नाही, तर हजारो शेतकऱ्यांना घेऊन या जलशुद्धीकरण केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा अनंत गुढे यांनी दिला.