अमरावती - जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात उलट-सुलट बोलून वातावरण खराब करणाऱ्या डॉ. अनिल बोंडे यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांच्यावर इलाज करण्याकरिता मानसोपचार तज्ञाची गरज आहे, असे म्हणत युवक काँग्रेसच्या वतीने आज शहरातील मानसोपचार तज्ञ डॉ. श्रीकांत देशमुख यांच्या मानसोपचार रुग्णालयासमोर आंदोलन केले.
युवक काँग्रेसने केली रूग्णालयात नोंदणी - जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजपा नेते डॉ.अनिल बोंडे यांच्यावर उपचार व्हावा यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील मानसिक आजार तज्ञ डॉ. श्रीकांत देशमुख यांच्या मानस रुग्णालयात रितसर पैसे भरून उपचारासाठी नोंदणी केली आहे. डॉ. अनिल बोंडे यांच्यावर त्वरित उपचार व्हावा अशी मागणी देखील युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले.
![काँग्रेसने रूग्णालयाबाहेर आंदोलन केले](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-amr-02-yuvak-lcongress-aandoan-vis-7205575_20042022132941_2004f_1650441581_1058.jpg)
वातावरण खराब करण्याचा प्रयत्न - डॉ. अनिल बोंडे गेल्या काही दिवसांपासून बिनबुडाचे विधान करीत जिल्ह्याचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहे. दोन समुदायात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य डॉक्टर अनिल बोंडे सातत्याने करीत आहेत. त्यांची मुलं त्यांनी परदेशात अभ्यासासाठी पाठवली असताना अनेक युवकांना मात्र दंगलीत लुटण्याचा प्रकार डॉ. अनिल बोंडे करू पाहात असून त्यांच्यावर त्वरीत उपचार व्हायला हवा असे युवक काँग्रेसने म्हटले आहे. डॉ. अनिल बोंडे यांनी स्वतःवर उपचार केले नाही तर यापुढे काँग्रेस नेत्यांना विरोधात त्यांनी अपशब्द वापरल्यास आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ असा इशारा देखील युवक काँग्रेसने दिला आहे.
![अनिल बोंडेंचा निषेध नोंदवला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-amr-02-yuvak-lcongress-aandoan-vis-7205575_20042022132941_2004f_1650441581_756.jpg)