अमरावती Rohit Pawar Speech : तेलंगणाच्या निकालाचा परिणाम नक्कीच विदर्भ आणि मराठवाड्यावर होणार आहे असं विश्लेषकांचं मत आहे. त्यामुळे वर काय झालं यापेक्षा आपल्या आजूबाजूला काय झालं हे अधिक महत्त्वाचं आहे असं विधान राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी केलं. युवा संघर्ष यात्रेच्या निमित्तानं ते अमरावतीमध्ये आले असता त्यांनी जिल्हा मराठी पत्रकार संघ येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. (Rohit Pawar Amravati PC)
म्हणूनच राष्ट्रवादी अशक्त झाली: कुठल्याही पक्षाचा कणा हा कार्यकर्ता असतो; परंतु आम्ही जेव्हा सत्तेत होतो तेव्हा कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांकडे आमचं काही प्रमाणात दुर्लक्ष झालं. कार्यकर्ता दुरावल्यामुळेच पक्षाची स्थिती मजबूत राहिली नाही. आता पुन्हा कार्यकर्ता आणि पदाधिकारी जोडण्याचं काम जोमानं सुरू आहे. सत्तेमध्ये असताना आम्ही आमचं लक्ष पॉलिसीवर अधिक केंद्रित केलं. आमच्या पक्षामध्ये अंतर्गत मजबुती राहिली नाही. त्यामुळेच आमच्या पार्टीमधील शिस्त बिघडून पक्ष अशक्त झाल्याची कबुली आमदार रोहित पवारांनी दिली. आम्हाला टिकून राहायचे असेल तर यापुढे पक्ष संघटनेकडे लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी बाहेर पडलो असल्याचं त्यांनी सांगितलं.
नेत्यांनी पक्ष केंद्रबिंदू ठेवला पाहिजे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना आमदार पवार म्हणाले की, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना न्याय मिळाला पाहिजे. निवडणुकांच्या दरम्यान तिकीट वाटप करतानासुद्धा सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मते किंवा त्यांच्याशी आदान प्रदान करून तसेच कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन तिकीटांचे वाटप झाले पाहिजे. कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे. या सर्व गोष्टींसाठी एक केंद्रीय प्रणाली विकसित होणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टींमुळे नेत्यांना असं वाटतं की, त्यांच्यामुळेच पक्ष आहे, अशी भावना अलीकडच्या काळात निर्माण झाली आहे.
अजित पवार फक्त मित्र मंडळ राहणार: यावेळी बोलताना रोहित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या वादावर मोठे विधान केले. राष्ट्रवादीची ओळख असलेले घड्याळ हे चिन्हं अजित पवार गट वापरत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कोणाची असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले की, निवडणूक येऊ द्या. मग घड्याळ कोणाकडे राहील हे समजेल. निवडणूक आयोगाला एकतर्फी निर्णय देता येणार नाही. आता फक्त अजित पवार मित्र मंडळ आहे, असा टोला त्यांनी लगावला.
वारकरी संप्रदाय नष्ट करण्याचे भाजापाचं षडयंत्र : महाराष्ट्रामध्ये भागवत आणि वारकरी संप्रदाय परंपरेचा खूप मोठा इतिहास आहे . हा संप्रदाय पूर्वी खूप ताकतवान होता आणि आजही आहे. परंतु अलीकडेच भाजपाकडून या वारकरी संप्रदायाला नष्ट करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. मध्यप्रदेशसह उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणात बाबा लोकांना महाराष्ट्रामध्ये आणले जात आहे. तेथील गुरु महाराष्ट्रमध्ये येऊन इथल्या भागवत आणि वारकरी संप्रदायाला आव्हान देऊ पाहत आहेत, असेही ते म्हणाले.
हेही वाचा: