अमरावती - अमरावती विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्या दिग्गज आव्हानाला टक्कर देण्यासाठी विरोधात कोण सक्षम उमेदवार असेल याबाबत अद्यापही काहीएक स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसच्या हक्काचा मतदारसंघ असणाऱ्या अमरावती मतदारसंघात आजच्या घडीला काँग्रेसकडे उमेदवार नाही. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभा खोडके यांचा मतदारसंघात प्रचाराचा झंझावात सुरू झाला आहे. काँग्रेसचे स्थानिक नेते अमरावती मतदारसंघ सोडणार नाही, असे बोलत असताना अमरावती मतदारसंघात नेमका काँग्रेसचा उमेदवार असेल की राष्ट्रवादी काँग्रेसचा? याबाबत पेच कायम आहे.
काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी अचानक निवडणूक लढणार नाही असे स्पष्ट केल्याने अमरावती शहर काँग्रेस पूर्णतः ढासळली आहे. डॉ. सुनील देशमुख यांच्याविरोधात उभा राहणारा एकही चेहरा सध्यातरी अमरावती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने समोर केला नाही. माजी महापौर विलास इंगोले, काँग्रेसचे शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष येजाज पैलवान, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष विश्वास देशमुख, आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष अनिकेत देशमुख असे निवडणूक लढण्यास इच्छुक असणारे अनेकजण काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे काँग्रेसच्या हक्काची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याचा प्रश्नच येत नाही असे काँग्रेसचे पदाधिकारी म्हणत आहे. मात्र, जी काही नावे काँग्रेसकडून पुढे केली जात आहेत, त्यापैकी निश्चित असा चेहरा उमेदवार म्हणून काँग्रेसचे पदाधिकारी स्पष्टपणे सांगत नाहीत.
हेही वाचा - 'प्रीती बंड राजकारणात नवख्या; सुनील खराटे योग्य उमेदवार, फेक कॉलमुळे शिवसैनिकांमध्ये खळबळ
एकीकडे काँग्रेस अमरावती मतदारसंघावरील आपला दावा सोडण्यास तयार नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभा खोडके यांनी मात्र अमरावती विधानसभा मतदारसंघात सभा पदयात्रा असा जनसंपर्क वाढविण्याचा धन्यवाद सुरू केला आहे. सुलभा खोडके या बडनेरा मतदार संघाच्या माजी आमदार असून गेल्या 2 निवडणुकीत त्यांचा बडनेरा मतदारसंघात पराभव झाला आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत सुलभा खोडके या काँग्रेसच्या उमेदवार म्हणून बडनेरा मतदारसंघात निवडणूक रिंगणात होत्या. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने सुलभा खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली होती. त्यामुळे गेल्या निवडणुकीत त्या काँग्रेसच्या उमेदवार म्हणून बडनेरा मतदार संघात उमेदवार होत्या.
हेही वाचा - अमरावतीमध्ये गळफास घेऊन तरूणीची आत्महत्या; प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय
यावेळी, मात्र आपण अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढणार अशी भूमिका सुलभा खोडके यांनी घेतली आहे. सुलभा यांचे पती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी 2014 नंतर काँग्रेसमध्ये असतानाच काँग्रेसने अमरावती मतदारसंघातून सुलभा यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती. संजय खोडके यांच्या या भूमिकेमुळे खोडके आणि शेखावत यांच्यात टोकाचे वितुष्ट निर्माण झाले. आता खोडके दांपत्याने काँग्रेस सोडून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून राष्ट्रवादी काँग्रेससाठी अमरावती विधानसभा मतदारसंघ सुटावा यासाठी त्यांनी प्रयत्न चालवले आहे. विशेष म्हणजे रावसाहेब शेखावत यांनी विधानसभा निवडणूक लढणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली असल्याने काँग्रेसकडे आता उमेदवारच नाही. यामुळे अमरावती मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुटावा अशी मागणी खोडके यांनी वरिष्ठ पातळीवर केली आहे.
हेही वाचा - अमरावतीमध्ये अंबादेवीच्या अभिषेकाने नवरात्रोत्सवाला प्रारंभ...
दरम्यान, काही झाले तरी अमरावती मतदारसंघ हा काँग्रेसच्या ताब्यात रहावा यासाठी शहर काँग्रेसने थेट काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठविले आहे. उमेदवारीवरून स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे. अमरावती शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची कुठलीही ताकद नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नगरसेवक महापालिकेत नाही. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही मोठा नेता खोडके यांच्या भूमिकेशी सहमत असताना दिसत नाही. असे असताना काँग्रेसच्या हक्काची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचा प्रश्नच येत नाही असे काँग्रेसचे पदाधिकारी स्पष्टपणे बोलतात. एकूण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा - खासदार नवनीत राणांनी दांडिया प्रशिक्षणात गरब्याच्या तालावर धरला ठेका
नुकताच सुलभा खोडके यांचा वाढदिवस असताना संपूर्ण अमरावती शहरात त्यांना शुभेच्छा देणारे फलक झळकले. या फलकांचे वैशिष्ट्य म्हणजे एकाही फलकावर राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठेही उल्लेख नव्हता. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभा खोडके ऐन वेळेवर काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरतील का? असे अनेक प्रश्न सध्या मतदारांच्या मनात घोळत आहेत.
हेही वाचा - अमरावती : चांदूर रेल्वे येथे व्यापाऱ्याची ६० हजारांची पिशवी पळवली