अमरावती - कामगाराने वेतन न मिळाल्याचा आरोप करत विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. विकास दिंडेकर असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कामगाराचे नाव आहे. तो डीगरगव्हाण येथील रहिवासी आहे. त्याच्यावर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विकास दिंडेकर हा गेल्या अनेक वर्षापासून रतन इंडियामधील एमबीपीएल या कंपनीत काम करतो. कोरोनाचे कारण देत कंपनीने मागील तीन महिन्यापासून वेतन न दिल्याने शेकडो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.
कामगारांनी लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून काहीच तोडगा न निघाल्याने शनिवारी शेकडो कर्मचाऱ्यांनी रतन इंडिया प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वाराव घोषणाबाजी केली. मात्र कंपनीने कुठलीच दखल न घेतल्याने व वेतन न मिळाल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या विकास दिंडेकर यांनी आज विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष उफाळला असून कामगार विरुद्ध व्यवस्थापन वाद उफळण्याची दाट शक्यता आहे.