अमरावती - कोरोनानाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 31 मार्चपर्यंत लग्नसोहळा अगदी थोडक्यात उरकावा. कोणत्याही परिस्थीतीत कार्यक्रमस्थळी गर्दी होणार नाही याची काळजी घ्या, असा सल्ला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी खबरादारीचा उपाय म्हणून सार्वजनिक समारंभ व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यानुसार नियोजित विवाह समारंभ किंवा खासगी कार्यक्रमही मोजक्याच पाहुण्यांसह साजरा करावा लागणार आहे.
जिल्हाधिकारी नवाल म्हणाले, विवाह किंवा इतर महत्त्वाचे खासगी कार्यक्रम यावर बंदी नाही. मात्र, गर्दी टाळण्यासाठी समारंभ सार्वजनिक पद्धतीने साजरे न करता कौटुंबिक व खासगी स्वरूपात साजरे करावेत. सद्यस्थिती पाहता गर्दी टाळणे आवश्यक आहे. काही कालावधीनंतर कोरोना विषाणू संसर्गाचा धोका नष्ट झाल्यावर व परिस्थिती सामान्य झाल्यावर सार्वजनिक समारंभाचे आयोजन करता येणे शक्य आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे ज्यांच्या घरी लग्न आहे अशा अनेक कुटुंबियांच्या चिंतेत भर पडली आहे.
हेही वाचा - कोरोना: रेल्वेच्या वातानुकूलित बोगीतील पडद्यांसह ब्लँकेटची सेवा बंद