अमरावती - शहरातील शिवनगर या परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. या परिसराची सद्यस्थितीची जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे, नगरसेवक संजय वानरे यांनी पाहणी केली. शिवनगर परिसरात प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांचा प्रत्यक्षस्थळी जाऊन त्यांनी आढावा घेतला.
शहरातील शिवनगर भागातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता जिल्हाधिकाऱ्यांसह काही अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केली. या परिसरातील नागरीकांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, साबणाने वारंवार हात धुवावे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सोबतच, या परिसरातील नागरिकांना त्यांनी मास्कचे वाटप केले. सदर परिसरातील काही रस्ते बॅरिकेट लावून बंद करण्याबाबत सूचना दिल्या. त्या अनुषंगाने सदर रस्त्यावर बॅरिकेट करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त योगेश पिठे, जेष्ठ आरोग्य निरीक्षक धनंजय शिंदे उपस्थित होते.
अमरावती महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोरोनाबाधित रुग्णांचे सहवासात किंवा संपर्कात आलेल्या व्यक्तीचे स्वॅब नमुने मनपा शाळा, नागपुरी गेट येथील लॅबमध्ये घेण्यात येते. त्या लॅब सेंटरचीही पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली. या ठिकाणी स्वॅब द्यायला आलेल्या नागरिकांची माहिती त्यांनी जाणून घेतली. येथे कार्यरत परिचारीका सुशिला दामले, मीनल राऊत, वैशाली बुरनासे यांची विचारपूस करुन त्यांना स्वतःची काळजी घेण्याच्या सुचना दिल्या. शासनानी दिलेल्या सूचनेचे पालन करुन आयुष मंत्रालयाने सुचित केलेल्या औषधींचा वापर करण्याबात सूचना दिल्या. सोबतच सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना तसेच इतरही कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, सहाय्यक आयुक्त तौसिफ काझी, डॉ. फिरोज खान, नुर खां उपस्थित होते.
अमरावती महानगरपालिकेचे शहरी आरोग्य केंद्र हैदरपुरा येथे जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. डॉ. पुर्णिमा उघडे व परिचारीका अर्चना बावीस्कर यांचेकडून त्यांनी या केंद्राची संपूर्ण माहिती जाणून घेतली. या आरोग्य केंद्रामार्फत माता-बाल संगोपन व लसीकरणाचे काम नियमितपणे सुरू आहे. या केंद्रांतर्गत ताजनगर तसेच इतरही प्रतिबंधित क्षेत्र येत असल्याने या केंद्राची जबाबदारीही मोठी आहे. या केंद्रांतर्गत येणाऱ्या संपूर्ण परिसराचे आतापर्यंत तीन वेळा सर्वेक्षण झाले असून नागरिक आता सहकार्य करत असल्याचे यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले. या केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांची त्यांनी आपुलकीने विचारपूस केली. गेल्या अनेक दिवसांपासून या केंद्राचे निरंतर कामकाज सुरू असून येथील कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक त्यांनी यावेळी केले.