अमरावती - अंजनगाव-सूर्जी तालुक्यातील नागरिकांनी मुख्यमंत्री साहय्यता निधी व पंतप्रधान साहय्यता निधीसाठी चार लाखाहून अधिक रक्कम तहसीलदारांना सुपूर्द केली आहे. यामध्ये तालुक्यातील काही सेवाभावी संस्थांचा देखील समावेश आहे. सर्वाधिक रक्कम मुर्हा देवी येथील जगदंबा संस्थानाने दिलीय. तर सारडा एज्युकेशन सोसायटीतर्फे मुख्यमंत्री साहय्यता निधीला प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.
अंजनगांव सूर्जी येथील कृषी साहित्य विक्री केंद्रामार्फत ५१ हजार रूपये, कृषी ऊत्पन्न बाजार समितीतर्फे ५१ हजार रुपये,निमखेड बाजार येथील गावकऱ्यांचे १७ हजार २०० रुपये, जमभावानी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसस्थेतर्फे १० हजार रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. तर मयूरी महिला बचत गटातर्फे ५ हजार रुपये, चिंचोली-शिगणे गावकरी मंडळींतर्फे ११ हजार ५० रुपये, तर दहिगाव-रेचा गावकऱ्यांतर्फे देखील आर्खिक साहाय्य पुरवण्यात आले आहे. तसेच विविध व्यक्तींनी देखील मदतीचा हात पुढे केलाय.
कोरोना विरोधातील लढ्यात तळागळातील सर्वच नागरिकांनी आपले योगदान दिल्याने हे युद्ध लवकरच जिंकण्याची आशा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदतनिधी जमा केलेल्या संस्था आणि नागरिकांचे तहसीलदार विश्वनाथ घुगे यांनी आभार मानले आहेत.