अमरावती (CM in Amravati) : बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने अमरावतीमधील नवाथे चौकात रविवारी विदर्भातील सर्वात मोठ्या दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलयं. या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक सिने कलावंत (Cine artistes) अमरावतीत येणार आहेत. या सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली असून या दहीहंडी स्पर्धेच्या निमित्ताने रविवारी अमरावती शहरात तरुणांची प्रचंड गर्दी उसळणार आहे. (Dahihandi in Amravati)
पोलीस आयुक्तांनी केली स्पर्धा स्थळाची पाहणी : अमरावती शहरातील नवाथे चौकात युवा स्वाभिमांची दहीहंडी स्पर्धा रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होणार असून ती रात्री दहा वाजेपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या वतीने नवाथे चौक परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी आज दुपारी नवाथे चौकात स्वतः जाऊन दहीहंडी स्पर्धेचं स्थळ, कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या मंचाची पाहणी केली. या स्पर्धेनिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नामवंत सिनेकलाकार येत असल्यामुळे उसळणारी गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी संबंधित सर्व पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी यावेळी विशेष सूचना दिल्यात. यासह युवा स्वाभिमान पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देखील योग्य खबरदारी राखण्यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी मार्गदर्शन केलयं. (Dahihandi in Amravati)
हे सिने कलावंत राहणार खास आकर्षण : युवा स्वाभिमान पार्टीच्या दहीहंडी स्पर्धेत आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे दांपत्य सर्वांचेच खास आकर्षण असताना या स्पर्धेत धमाल आणण्यासाठी सिने अभिनेता (Cine artistes) संजय दत्त, शिल्पा शेट्टी, अमिषा पटेल, राजपाल यादव यांची उपस्थिती खास आकर्षण ठरणार आहे. युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं रविवारी अमरावती शहरातील नवाथे चौक येथे दिवसभर दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यानंतर सोमवारी अंजनगाव सुरजी येथे टाकरखेडा नाका या ठिकाणी दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलयं. तर मंगळवारी तिवसा येथील देवराव दादा हायस्कूल येथे दहीहंडी स्पर्धा होईल, त्यानंतर बुधवारी परतवाडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात दहीहंडी स्पर्धा होणार असून गुरुवारी मेळघाटातील धारणी येथे जिल्हा परिषदेच्या मैदानावर दहीहंडी स्पर्धा होणार आहे.
हेही वाचा :