अमरावती - ग्रामपरिवर्तन अभियानाअंतर्गत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील शेंदोळा खुर्द हे गाव मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले आहे. या गावात १५ दिवसांनी पाणी येत असल्याने संतप्त महिलांनी बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्वाकांक्षी ग्रामपरिवर्तन विकास अभियान महाराष्ट्रासह जिल्ह्यातील १२ गावात राबविले जात आहे. यात धारणी तालुक्यातील ८ व तिवसा तालुक्यातील ४ गावांचा समावेश आहे. तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द हे गाव या योजनेत आहे. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून या गावात अनेक विकासात्मक कामे झाली असली तरी पाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.
या गावात विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, सीसीटीव्ही कॅमेरे, जलशुद्धीकरण केंद्रांसह आदी छोटे मोठे कामे झाली आहेत. परंतु, पाणी आणण्यासाठी आजही येथील महिलांना हातपंपावर जावे लागत आहे. दुष्काळामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे गावात पाणीबाणी निर्माण झाली आहे. गावात ग्रामपरिवर्तन विकासाचा आराखडा तयार झाला तेव्हा घरोघरी नळ जोडणी देण्याचे ठरविण्यात आले होते. तसेच प्रत्येक कनेक्शनवर मीटर बसवण्याचेही ठरवण्यात आले होते. परंतु, निधी नसल्याचा कांगावा करत ही मागणी फेटाळली गेली होती. त्यामुळे आज गावावर पाण्याचे संकट आले आहे. आम्हाला तात्काळ पाणी द्या, या मागणीसाठी संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या मांडला.
सद्या तात्काळ पाणीटंचाई निवारण करण्यासाठी ग्रामपंचायतीने दीड लाखांचे नियोजन केले आहे. त्यातून ग्रामपंचायतीच्या मालकीच्या २ विहरीचे खोलीकरण करण्यात येणार आहे. आणखी दोन विहरी अधिग्रहित करण्याचा ग्रामपंचायतीचा विचार आहे. मुख्यमंत्री ज्या गावाला दत्तक घेतात, त्या गावाची जर पाण्यासाठी वणवण असेल तर इतर गावांची परिस्थिती काय असेल याचा विचारही न केलेलाच बरा.