अमरावती - राज्यात वर्ग पाहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासाठी पुरवठा करण्यात आलेले तांदूळ प्लास्टिक सदृश्य असल्याचा आरोप धानोरा कोकाटे या गावांतील ग्रामस्थांनी केला होता. तसा मसेज देखील समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या मॅसेजची दखल घेत राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या कार्यालयाने त्या तांदुळाची तपासणी करण्याचे आदेश शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्याच अनुषंगाने शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी व शालेय पोषण अधीक्षकांनी शुक्रवारी गावात जाऊन त्या तांदळाची पाहणी केली आहे. त्यावेळी हा तांदूळ आहारायोग्य असल्याचे स्पष्टीकरण शिक्षणविभागाकडून देण्यात आले आहे.
सरकारच्या वतीने विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजना अनेक वर्षांपूर्वी सुरू केली आहे. या मध्यांन भोजन योजनेच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना दुपारच्या सुमारास भाताचा आहार दिला जातो. परंतु कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना थेट आहाराऐवजी तांदूळ हा शाळेतून दिला जातो. अशाच प्रकारे अमरावती जिल्ह्यातील धानोरा कोकाटे या गावातील जिल्हा परिषद शाळेत वितरणा करता आलेला तांदूळ हा विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. घरी गेल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी तांदूळ बघितला असता, त्यात काही प्रमाणावर प्लास्टिक सदृश्य तांदळाचे दाणे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. तांदळामध्ये प्लास्टिकच्या तांदळाची भेसळ असल्याचा आरोपही या गावातील पालकांनी केला होता. त्यानंतर हा मेसेज सोशल मीडियावरही वाऱ्यासारखा पसरला, त्यामुळे जिल्ह्यातील पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यानंतर या प्रकरणाची दखल शिक्षण विभागाने घेतली .
पोषण आहाराच्या तांदळात अल्प प्रमाणात मिश्रित असलेले तांदळाचे दाने हे प्लॅस्टिक तांदूळ नसून तो तांदूळ फोर्टीफाईड तांदुळ (Fortified rice) आहे. तसेच हा तांदूळ विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असून तो विद्यार्थ्यांच्या शरीरातील लोहाची कमतरता दूर करणारा असल्याचा खुलासा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. तरीही पालकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी हा तांदूळ प्रयोगशाळेमध्ये पाठवणार असल्याची माहितीही शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
तांदूळ शिजवून केली चाचणी-
शुक्रवारी सकाळी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी धानोरा कोकाटे या गावात भेट देऊन जिल्हा परिषद शाळेतील तांदळाची पाहणी केली. या तांदळामध्ये काही अंशी वेगळ्या प्रकारचे तांदळाचे दाणे आढळून आले.यावेळी त्यातील वेगळे दाणे काढून त्या तांदळाचा भात शिजवण्यात आला. यावेळी त्याची चवही तपासणी साठी आलेल्या अधिकाऱ्यांनी घेतली.दरम्यान या तांदळामध्ये कुठलीही भेसळ नसून वेगळे दिसणारे हे दाणे हे fortified rice आहेत. यामध्ये तांदुळाच्या पिठामध्ये lrion, folic acid and vitamin B-12 घटक एकत्रित केले आहे. सदर fortified तांदूळ हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असून त्यामुळे लोहाची कमतरता, अशक्तपणा व इतर महत्त्वपूर्ण घटकांची स्थिती सुधारते असा खुलासाही यावेळी अधिकाऱ्यांनी केला आहे.