अमरावती - राज्यातील क्वारंटाईन सेंटरमध्ये महिला सुरक्षित नाहीत हे दुर्दैव आहे. कोविड रुग्णालयात घडलेला प्रकार हा प्रचंड संतापजनक असून केवळ त्या आरोपीला अटक होणे हा न्याय नाही. तर या घटनेस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होणे आवश्यक आहे. केवळ भाषण नव्हे तर महिलांचा सन्मान करणारा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे मुख्यमंत्र्यांनी कृतीतून दाखविण्याची वेळ आली असल्याचे भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी अमरावतीत म्हटले आहे.
बडनेरा येथील कोविड सेंटरवर टेक्निशियनने कोरोना चाचणीसाठी गुप्तांगातून स्वब घ्यावा लागेल असे सांगून एका युवतीशी केलेल्या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी चित्रा वाघ आणि भाजपच्या महिला आघाडी प्रदेश सचिव अर्चना डेहणकर दाखल झाल्या. त्यांनी पीडित युवतीची भेट घेऊन तिच्याशी संवाद साधला. शिवाय बडनेरा येथील कोविड सेंटरचीही पाहणी केली. पोलिसांकडून तपासाची माहिती घेतली. या संपूर्ण प्रकारची माहिती जाणून घेतल्यावर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहर अध्यक्ष किरण पातूरकर, अमरावतीच्या उपमहापौर कुसुम साहू, महापालिका स्थायी समिती सभापती राधा कुरील, नागपूरच्या उपमहापौर मनीषा कोठे, भाजप प्रवक्ता शिवराय कुलकर्णी आदी उपस्थित होते.
चित्रा वाघ म्हणाल्या, मुंबई, पुणे, पनवेल, चंद्रपूर आणि बडनेरा या ठिकाणी घडलेल्या घटना अतिशय धक्कादायक आहेत. कोरोना सेंटरमध्ये महिलांवर अत्याचार होतो ही साधी घटना नाही. क्वारंटाईन सेंटर, कोविड रुग्णालय या ठिकाणी महिलांवर बलात्कार तसेच त्यांचा विनयभंग करणारे बाहेरुन आले नव्हते तर ते यंत्रणेतीलच व्यक्ती होते. बडनेरा येथे युवतीशी गंभीर प्रकार करणारा व्यक्ती हा येथील आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी होता. त्याच्या वागणूकी विरोधात केंद्रावरील महिला कर्मचाऱ्यांनी तक्रार दिली होती. मात्र वरिष्ठांकडून तक्रारीची दाखल घेतली गेली नाही. कर्मचारी महिलांसोबत त्याने गैरवर्तवणूक केली नसली तरी तपासणीसाठी येणाऱ्या अनेक महिलांशी हा प्रकार केला असल्याचे त्याने पोलीस तपासात सांगितले असल्याचे त्या म्हणल्या.
क्वारंटाईन सेंटर आणि कोविड रुग्णालयाची जबाबदारी आरोग्य यंत्रणेचे प्रमुख असणाऱ्या जिल्हा शल्यचिकित्सकांची आहे. मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई का झाली नाही हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पुढे म्हणाल्या, अमरावतीच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला व बालकल्यण मंत्री यशोमरी ठाकूर यांनी या परिस्थितीत कोणत्याही अधिकाऱ्यांवर कारवाई करणे उचित नाही असे म्हटले. त्यांची ही भूमिका पटणारी नाही. आमच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराबाबत आवाज उठवला असताना यशोमती ठाकूर यांनी त्यांना आंधळे संबोधणे उचित नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सत्ताधाऱ्यांच्या चुका दाखविण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही वाघ म्हणाल्या.
हिंगणघाट येथील घटनेनंतर राज्य शासनाने महाराष्ट्रात आंध्रप्रदेश प्रमाणे दिशा कायदा लागू करणार अशी भूमिका घेतली. यासाठी अनेक बैठका सुरू झाल्या होत्या. दुर्दैवाने महाराष्ट्रातील महिलांना आजही दिशा कायदा लागू कधी होणार याची वाट पाहावी लागत आहे. राज्यातील क्वारंटाईन सेंटर आणि कोविड रुग्णालयात महिलांच्या वॉर्डमध्ये पुरुष नसावेत. त्यांच्या वॉर्डमध्ये सफाई कर्मचारी या महिलाच असाव्यात. महिलांचा वॉर्ड हा तळ मजल्यावरच असावा तसेच या दोन्ही ठिकाणी पीपीई किट परिधान करून चार पोलिसांचा बंदोबस्त असायलाच हवा अशी मागणी चित्रा वाघ यांनी यावेळी केली.