अमरावती - विदर्भाचे काश्मीर म्हणून चिखलदराची ओळख आहे. सध्या राज्यात थंडीने जोर धरला असून चिखलदरामध्येही थंडी आणि धुक्याचे वातावरण आहे. हिरवेगार निसर्ग, नद्या, डोंगरांची साथ आणि आल्हाददायक वातावरणामुळे सध्या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांच्या गर्दीने विदर्भाचे हे काश्मीर फुलून गेले आहे.
हेही वाचा - अमरावती विद्यापीठात कुलगुरु आणि सिनेट सदस्यांमध्ये वाद
हाड गोठवणारी थंडी
सध्या राज्यभरात थंडीचा जोर वाढला आहे. अशातच आधीच थंड वातावरण असलेल्या चिखलदरात थंडीने उच्चांक गाठला आहे. थंडीमुळे चिखलदराचे सौंदर्य आणखी फुलले आहे. दूरवर पसरलेली धुक्याची चादर, श्वास रोखून धरायला लावणाऱ्या पर्वत रांगा, हजारो फूट उंचीवरून कोसळणारे धबधबे, नागमोडी रस्ते, वातावरणात गारवा, हाड गोठवणारी थंडी आणि समोर पेटलेली शेकोटी, अशी काहीशी विलोभनीय दृश्य सध्या मेळघाटात बघायला मिळत आहे.
राज्यभरातील पर्यटक दाखल
साधारणत: जुलै महिन्यापासून चिखलदरातील पर्यटनाला सुरुवात होत असते. परंतु, यावर्षी कोरोनामुळे चिखलदरा मधील पर्यटन बंद होते. त्यामुळे, हजारो पर्यटकांचा हिरमोड झाला होता. परंतु, १ सप्टेंबरपासून येथील पर्यटन सुरू झाले. त्यात आता वातावरणात असलेल्या गारव्याचा आनंद, त्यातच ख्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप देवून नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी राज्यभरातून पर्यटक येथे दाखल झाले आहेत.
देवी पॉईंटवर घोडा सफारी, उंट सफारी
निसर्गात असलेली अद्भुत किमया येथे येऊन अनुभवतो, असे पर्यटक सांगतात. चिखलदरात विविध पाहण्याजोगे स्थळ आहेत. मात्र, येथील प्रसिद्ध देवी पॉईंट तर अक्षरशः गर्दीने फुलून गेला आहे. उंच पहाडावर असलेली घोडा सवारी, उंट सवारी, सायकल सवारी यामुळे पर्यटकांची पसंती देवी पॉईंटला अधिक दिसून येते. तर, देवी पॉईंट लगत असलेल्या तलावावर बोटिंगचा आनंद घेताना पर्यटक दिसताहेत.
कोलकासमध्येही पर्यटक
समुद्र सपाटी पासून हजारो किलोमीटरवर असलेला चिखलदरा पर्यटकांना भूरळ पाडत आहे. सोबतच जवळच असलेले सेमाडोह आणि जंगलातील हत्ती सफारीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोलकास येथे जाऊन पर्यटक निसर्गाचा मनमुराद आनंद घेतात.
हेही वाचा - नवीन वर्षात राज्य सरकारला सुबुद्धी मिळावी - देवेंद्र फडणवीस