अमरावती - राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. जम्मू कश्मीर तसेच हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये ही हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तर भारतात बऱ्याच ठिकाणी थंडीची लाट आहे. सध्या वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहायला सुरुवात झालेली आहे. परंतु, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे विदर्भात दक्षिणेकडून वारे वाहत असल्यामुळे सध्या थंडीचे प्रमाण आटोक्यात आहे. पण येत्या दोन ते तीन दिवसांत विदर्भात वारे उत्तरेकडून व्हायला लागण्याची शक्यता आहे. परिणामी विदर्भात लवकरच थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचे मत हवामान तज्ञ अनिल बंड यांनी व्यक्त केले आहे.
तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरणार -
सध्या किमान तापमान १२ ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असून लवकरच यामध्ये घट येऊन किमान तापमान पुढील दोन दिवसांत १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते. त्यामुळे ३० नोव्हेंबरनंतर रात्री विदर्भात तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.