अमरावती - देशात कोरोनामुळे संचारबंदी लागू आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र, आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्याने तलवारीने भर रस्त्यात केक कापून वाढदिवस साजरा केल्याची घटना घडली आहे. अश्विन उके असे या कार्यकर्त्याचे नाव असून त्याने वाढदिवसाचा केक त्याच्या घरासमोरच रस्त्याच्या कडेला तलवारीने कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उकेसह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तलवारीने केक कापून वाढदिवस २५ मेच्या रात्री वाढदिवसाच्या निमित्ताने अश्विन उकेसह आणखी काही मित्रांनी शहराच्या बिचूटेकडी परिसरातील राहुल नगरात एकत्र येत वाढदिवस साजरा केला. उके याच्या घरासमोर दुचाकी उभी करून त्यावर आमदार लिहिलेला केक होता. याच्यासमोर अश्विन उके आणि आकाश उके हातात लांब तलवार हातात घेऊन केक समोर उभे असल्याचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या माध्यमातून आरोपी दहशत निर्माण करत असल्याची तक्रार भीम बिग्रेड संघटनेचे राजेश वानखडे यांनी फ्रेजरपुरा पोलिसांत दाखल केली. संचारबंदी सुरू असताना केक कापणाऱ्यांनी मास्क लावले नव्हते. तसेच, अवैधरीत्या शस्त्र बाळगणे गुन्हा असतानाही तलवारीने केक कापल्याप्रकरणी अश्विन उके, आकाश उके, सतीश पाटील, रितेश गवई आदी आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.