अमरावती - गाईचे दर्शन घेऊन तिच्या पाठीवरून हात फिरवल्यास आपल्या शरीरातील नकारात्मकता दूर होते, असे वक्तव्य राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे. तसेच हा चमत्कार आहे, हे सर्व आपल्या संस्कृतीमध्ये सांगितले आहे, असेही त्या म्हणाल्या. तिवसा तालुक्यातील सार्शी (गाईची) येथे गावाचे दैवत समजल्या जाणाऱ्या एका मृत गाईच्या पुण्यतिथी निमित्ताने त्या बोलत होत्या.
गाय म्हणजे माता आहे. माता म्हणजे राजकारण नव्हे. मागच्या काळामध्ये चहावाली सरकारने गायवर राजकारण केले. यानंतर ही सरकार गायवर अडकली. मात्र, आता त्याच्याही पलीकडे जाऊन सर्वांनी मिळून काम करायचे आहे. असेही मंत्री ठाकूर म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या, व्यक्तिमत्त्व विकासासंबंधित अनेक कोर्स येत आहेत. अनेक मोठ्या स्तरातील समाज यासंबंधित प्रशिक्षण घेत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात पैसाही घेतला जातो. मात्र, यामुळे आपण आपली संस्कृती विसरत आहोत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - तारापूर औद्योगिक वसाहत दुर्घटना: पालकमंत्र्यांनी एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर
तेच दुसरीकडे गाय एक उपयुक्त पशू आहे. जर कुणी म्हणत असेल की गाईच्या अंगावरून हात फिरविल्याने मन शांती मिळते किंवा शरीरातील नकारात्मकता नष्ट होते तर ते आजच्या वैज्ञानिक काळात संयुक्तिक वाटणार नाही, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव हरिष केदार यांनी व्यक्त केले. तर मंत्री ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना समाज माध्यमांवर ट्रोल केले जात असल्याचे दिसत आहे.