अमरावती - जिल्ह्यात आज (गुरुवारी) पहाटे ५ वाजल्यापासून मुसळधार पावसासह गारपटी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांची तत्काळ पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन यशोमती ठाकूर यांनी दिले.
गेल्या ३ दिवसांपासून विदर्भात ढगाळ वातावरण आहे. त्यातच कडाक्याची थंडी आहे. यामुळे आधीच तूर पिकावर रोग आल्याने तुरीचे पीक वाळले आहे. त्यामध्येच आज सकाळी पाऊस आणि जोरदार गारपीट झाली. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.