अमरावती - राज्यात कोरोना महामारीचे संकट असताना पडद्याआड अनेक राजकीय घडामोडीला वेग आल्याची चर्चा आहे. राज्यात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या यावरून भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडीला लक्ष केले आहे. आता या वादात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उडी घेतली आहे. भाजपने, घाणेरडे राजकारण करू नये, सत्तेची लालसा इतकी नसावी. सत्ता तर सोडा कुणी तुम्हाला राज्यातही उभे करणार नाही, अशा शब्दात बच्चू कडू यांनी विरोधी पक्षाला सुनावले आहे.
कोरोना विषयावरून सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष यांच्यात जोरात जुंपली आहे. यात आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही उडी घेतली. सध्या कोरोनामुळे राज्य संकटात असताना अशाप्रकारे अतिशय खालच्या स्थराचे राजकारण विरोधी पक्ष करत आहे. हे बालिशपणाचे राजकारण असून ते करण्याचे काम विरोधी पक्ष करत आहे. सत्ता तर दूरची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील जनता तुम्हाला राज्यात उभेही करणार नाही, अशा शब्दात बच्चू कडू यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.
तसेच सध्या जनतेची काळजी घेणे गरजेचे आहे. यात राजकारण करू नये, असेही आवाहनही बच्चू कडू यांनी केले आहे.
दरम्यान, कोरोनाच्या उपाययोजनेवरून भाजपने सत्ताधारी ठाकरे सरकारला लक्ष केले आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी, राज्याचे नेतृत्व बिनकामाचे असून कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती बिकट होत चालल्याचे सांगत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. राणे यांच्या आधी संजय राऊत, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी राज्यपाल यांची भेट घेतली. यामुळे राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले.
हेही वाचा - अमरावतीच्या प्रतिबंधित क्षेत्रातील आरोग्य केंद्राचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
हेही वाचा - अमरावती नागपूर महामार्गावर कार-ट्रॅक्टरचा अपघात, जीवितहानी नाही.