अमरावती - वाळलेल्या संत्रा झाडांच्या अनुदानासाठी 1 सप्टेंबरपासून आत्मक्लेश आमरण उपोषणाला वरुडमधील केदार चौकातून सुरुवात झाली. या शेतकरी हिताच्या उपोषणाला युवा व्यापारी संघ, व्यापारी संघटना, कृषी साहित्य विक्रेता संघ, सुवर्णकार संघ आदी व्यावसायिकांनी पाठिंबा देऊन समर्थन जाहीर करत मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत स्वयंस्फुर्तीने आपली दुकाने बंद ठेवली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने वरुड येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ आत्मक्लेश आमरण उपोषण सुरू असून ३ दिवसानंतरही प्रशासकीय अधिकारी या मंडपाकडे जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे प्रशासनाविरोधात आक्रोश तयार होत आहे. या उपोषणाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भातील अध्यक्ष देवेंद्र भुयारांसह ऋषीकेश राऊत, गौरव गनोरकर, अरविंद माटे, अर्जुन डंभाळे, छत्रपती वड्बूदे, गंगाधार पांधरे, भूषण कराळे, जावेद शेख, रुपेश जिचकर, आदी कार्यकर्ते या आत्मक्लेश उपोषणाला बसलेले आहेत. मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत युवा व्यापारी, व्यापारी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आपला पाठिंबा दिला आणि स्वयंस्फुर्तीने आपली दुकाने बंद ठेवली