अमरावती - रक्तदान चळवळीत आघाडीवर असणाऱ्या अमरावती शहरात आज पहिल्यांदाच चक्क स्मशानभूमीत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. ज्या ठिकाणी आयुष्याचा प्रवास संपतो अशा स्मशानभूमीत कोणालातरी जीवनदान देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमात शंभरच्यावर रक्तदात्यांनी रक्तदान करून नवा विक्रम रचला.
अमरावती येथील शिवरत्न जिवबा महाले चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने येथील हिंदू स्मशानभूमीत पहिल्यांदाच रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. रक्तदान शिबिरासोबतच विद्युत दाहिनी बाबत यावेळी जनजागृती देखील करण्यात आली. थेट स्मशानभूमीत रक्तदानासाठी पुरुषांसोबत महिलाही पोहोचल्या होत्या. ज्या स्मशानभूमीत रक्तासह सर्व नाती तुटतात अशा ठिकाणी रक्तदानाच्या माध्यमातून कोणाला तरी आपण जीवनदान देणार आहोत याचा आनंद रक्तदात्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. स्मशानभूमीत एकीकडे मृतदेहांना भडाग्नी दिली जात होती. त्याचवेळी रक्तदानाच्या माध्यमातून जीवनाकडे पाहण्याबाबत एक सकारात्मक संदेश दिला जात होता. शिवरत्न जिवबा महाले चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विवेक राउत यांच्या पुढाकाराने आयोजित हा आगळावेगळा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांनी सहकार्य केले.
हेही वाचा- यशोमती ठाकूरांना मिळणार 'महिला व बाल कल्याण' खाते? अमरावतीत समर्थकांची बॅनरबाजी