अमरावती - सामान्य लग्नापेक्षा एक वेगळा लग्न सोहळा अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगावात पार पडला. सनी शेळके आणि मोनिका अढाउ यांच्या लग्नात रक्तदान, आरोग्य तपासणी यासारखे उपक्रम राबवण्यात आले. लग्नात येणाऱ्या शेकडो वऱ्हाडी मंडळींची रक्त तपासणी, सहा जणांचे मरणोत्तर नेत्रदान, अनेकांची आरोग्य तपासणी आणि या जोडप्यानेही स्वत: देहदानाचा संकल्प करून नव्या पिढीसमोर एक आदर्श घालून दिलाय. लग्नात एकून 46 बाटल्या रक्त जमा झाले.
लग्नपत्रिकाही सामाजिक संदेशाने भरलेली पाहायला मिळाली. पत्रिका संतांचे विचार मांडणारी, लग्नपत्रिकेच्या आतील भागात बळीराजाचा फोटो लावून शेतकाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. राजमाता जिजाऊ आणि बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून देणाऱ्या महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचे छायाचित्रेही छापण्यात आली. विशेष म्हणजे संविधानाची उद्देशिकाही लग्नपत्रिकेत मांडण्यात आली.
हेही वाचा - पोर्तुगीजांच्या गोळ्या झेलल्याचा पश्चाताप होतोय; स्वातंत्र्य सैनिकाची उद्विग्नता
आपल्या पतीने लग्नाचा अवाढव्य खर्च न करता सामाजिक भावनेतून अनेक चांगले उपक्रम राबवल्याने नववधूनेही समाधान व्यक्त केले आहे. यापुढे आपणही पतीच्या पावलावर पाऊल ठेवणार असल्याचे ती म्हणाली. शेळके कुटुंबाने मेळघाटातील आदिवाशी कलाकारांना लग्नात गायनाची संधी उपलब्ध करून दिली. या माध्यमातून त्यांना पैसेही मिळाले. या अनोख्या विवाहाचे गावकऱ्यांनी कौतुक केले. संपूर्ण लग्नातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश शेळके कुटुंबाने देण्याचा प्रयत्न केला आहे.