अमरावती - अर्णब गोस्वामी अटक प्रकरणावरून पत्रकारांनी भाजपच्या दुहेरी भूमिकेबाबत प्रतिसवाल केला असता, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील संतापले. त्यामुळे पाटील यांच्या आजच्या पत्रकार परिषदेत गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. मरावती विभागीय पक्ष कार्यकर्ता बैठकीसाठी अमरावतीत आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी हा प्रकार घडला आहे.
अमरावती विभाग शिक्षक संघाच्या निवडणुकीत भाजप आपला अधिकृत उमेदवार देणार आहे. याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सूतोवाच केले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध नोंदवला. तसेच राज्य सरकारच्या कारवाईविरोधात टीकाही केली. त्यानंतर पत्रकारांनी भाजपने सुद्धा अनेक पत्रकारांची मुस्कटदाबी केली आहे, मग आता तुम्हाला अर्णव गोस्वामीचा पुळका का येतो आहे? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी चंद्रकांत पाटील पत्रकारांवरच संतापले, त्यामुळे पत्रकार परिषदेत गोंधळ उडाला.
चंद्रकांत पाटील यांची अरेरावी कोरोनावरून शासन गोंधळात-जगात अमेरिका आणि ब्राझीलनंतर सर्वाधिक कोरोनाग्रस्तांमध्ये महाराष्टाचा क्रमांक लागतो. कोरोना नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासन अपयशी ठरले, असा आरोप चंद्रकांत पाटील केला. तसेच आता शाळा कशा सुरू करायच्या, करायच्या की नाही करायच्या? असा शासनाचा गोंधळ सुरू असल्याची टीकाही पाटील यांनी यावेळी केली. तसेच 1 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान शैक्षणिक सत्र सुरू करावे, अशी आमची मागणी असल्याचे पाटील म्हणाले.
यशोमती ठाकूर यांनी राजीनामा द्यायलाच हवा-महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात न्यायलायने त्यांना शिक्षा ठोठावली असल्याने त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा द्यायलाच हवा, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांची अरेरावी आणि दिलगिरी-कुठल्याही पत्रकार संघटनेने अर्णव गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध नोंदविला नसताना तुम्हाला त्याचा पुळका का आला? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी, एखाद्या पत्रकारांच्या पाठीशी उभं राहणं हा विषय आमच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग असल्याचे स्पष्ट केले. देशातील अनेक पत्रकारकरांची मुस्कटदाबी भाजपने केली असताना त्यावेळी तुम्ही गप्प का होते? या प्रश्नावर मात्र, पाटील निरुत्तर झाले. भाजपच्या अनेक नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत. अमित शाह यांच्यावरही गुन्हे दाखल होते, असे असताना आज यशोमती ठाकुरांचा राजीनामा कसा काय मागत आहात? या प्रश्नावरून चंद्रकांत पाटील एका पत्रकाराशी अरेरावीची भाषा वापरली.
पाटलांच्या या अरेरावीपणावर पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना तुम्हीच पत्रकारांना दबावात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहात, असे सुचित केले. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी शांत होत माझी चूक झाली, दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत पत्रकार परिषद गुंडाळली.