अमरावती - कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असून, खरीप हंगामासाठी मोफत बी-बियाणे आणि शेती अवजारांचे वाटप करावे, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी केली.
भाजपतर्फे एक पत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या 2 महिन्यापासून कोरोना संकटामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्ष, केळी, मोसंबी, डाळिंब यासारख्या फळबागा मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. मात्र, देशात लॉकडॉऊन असल्याने शेतकऱ्यांना आपला माल बाजारात विक्री करता आला नाही. त्यामुळे मोठं नुकसान झाल्याने राज्य सरकारने मदतीसाठी उभं राहावं अशी मागणी भाजप प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी केली.
शेतकऱ्यांना कोरोनाच्या या संकटामुळे हरभरा, गहू, ज्वारी हे पीक चांगले येऊनसुद्धा केवळ लॉकडाऊनमुळे बाजारात नेता आले नाही. आता खरीप हंगाम 15 दिवसांवर आला आहे. यंदा शंभर टक्के पाऊस असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र, शेतकऱ्यांजवळ खरिपाची मशागत करण्यासाठी पैसे नाहीत. शेत नांगरणीचे भाव, रुटर करण्याचे भाव दुप्पट झालेले आहेत. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक तणावाखाली असून जर सरकारने काही मदत केली तरच आता बळीराजा तग धरू शकणार असल्याचे बोराळकर म्हणाले.
देशातील इतर राज्यांनी कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना मदत केली. मात्र, महाराष्ट्र सरकारन शेतकऱ्यांना अद्याप कुठल्याही प्रकारची मदत केलेली नसल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी केला. येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मोफत बी-बीयाणे द्यावे आणि शेतीची अवजारे मोफत द्यावी. तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी आर्थिक मदत करा, नाहीतर कृषी दुकानातून बी-बियाणे सात बारावर मोफत वाटप करा, अशी मागणीही शिरीष बोराळकर यांनी केली.