अमरावती - हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पती, आई आणि अपर प्रधान उप वनसंरक्षकाच्या नावाने लिहिलेली आहेत. ही तीन्ही स्वतंत्र पत्रे नीट वाचली तर प्रत्येक पत्रात अपर प्रधान उपवन संरक्षक श्रीनिवास रेड्डी याचा उल्लेख आहे. झालेल्या सर्व प्रकरणाला तो देखील जबाबदार असल्याचे लक्षात येते. त्यामुळे दीपाली चव्हाण आत्महत्त्या प्रकरणात उपवनसंरक्षक शिवकुमार प्रमाणे रेड्डीवर गुन्हा दाखल करून त्याला सहआरोपी करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे. रविवारी पत्रकार परिषद घेऊन दीपाली चव्हाण आत्महत्त्या प्रकरणातील गंभीर मुद्द्यांवर शिवराय कुळकर्णी यांनी लक्ष वेधले.
रेड्डीकडून पदाचा दुरुपयोग -
दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्त्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेड्डीची तडकाफडकी बदली केली. या प्रकणात रेड्डी दोषी नसता तर त्याची अशी बदलीची झाली नसती. आता रेड्डी बदलून गेला असताना त्याने आपल्या जुन्या लेटरहेडचा वापर करून आपल्या निर्दोषत्वचे पत्र लिहिले. वन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकावून नेत्यांच्या दारोदारी ते पत्र घेऊन जाण्यास रेड्डी भाग पाडत आहे. श्रीनिवास रेड्डी आपल्या पदाचा दुरुपयोग करत आहे, असा आरोप शिवराय कुळकर्णी यांनी केला.
मंगळवारी वन विभाग कार्यालयावर हल्लाबोल -
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डी हा देखील दोषी आहे. असे असताना त्याला शिवकुमासह आरोपी बनवण्यात आले नाही. आपल्या कर्मचाऱ्यांना धमकावून या प्रकरणातून स्वतःचा बचाव करण्याचा तो प्रयत्न करत आहे. रेड्डीवर कारवाई करावी ही आमची मागणी आहे. या मागणीसाठी मंगळवारी भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्या नेतृत्वात वन विभाग कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन केले जाणार आहे, असे शिवराय कुळकर्णी यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण -
मूळच्या साताऱ्याच्या असणाऱ्या दीपाली चव्हाण या 2014मध्ये राज्य सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन वन विभागात रुजू झाल्या होत्या. त्यांना वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून धुळघट रेल्वे येथे पहिली नियुक्ती मिळाली होती. 2019 मध्ये त्यांची हरिसालला बदली झाली. हरिसाल वनपरिक्षेत्रात येणाऱ्या अनेक गावांच्या पुनर्वसनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यांच्याकडे वनपाल, वनमजूर असा पुरेसा कर्मचारी वर्ग नसतानाही त्यांनी 'मांगीय' या गावचे पुनर्वसन केले. यादरम्यान आदिवासी बांधवांनी त्यांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला. चव्हाण यांनी याबाबत विनोद शिवकुमारला माहिती दिली. मात्र, त्या खोटे बोलत असल्याचा आरोप करत दीपाली यांची मदत केली नाही. आदिवासी बांधवांच्या तक्रारीवरून दिपाली चव्हाण यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. त्यावेळी देखील शिवकुमारने मदत केली नाही.
हेही वाचा - मुरूड महिला पोस्टमास्तरची आत्महत्या, दीपाली चव्हाण प्रकरण ताजे असतानाच घडली दुसरी घटना