अमरावती - जिल्ह्यातील वरूड येथे शिवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश घारड यांच्यावर गोळीबार केल्याच्या निषेधार्थ काल वरुड शहर बंदचे आवाहन करून शिवसेना आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली.
हेही वाचा - Tensions in Wadali : लग्नाच्या वरातीत दगडफेक: वडाळी परिसरात तणाव
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त - शनिवारी रात्री शिवसेना उपशहर प्रमुख योगेश घारड यांच्यावर मुलताई चौक परिसरात राजू तडस आणि एका युवकाने गोळी झाडली. या घटनेनंतर संपूर्ण वरुड शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली असून, शिवसैनिक आणि बजरंग दलाने काल सकाळी शहर बंदचे आवाहन केल्यावर संपूर्ण वरुड शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला. काल वरुड येथील संपूर्ण बाजारपेठ बंद होती. रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता.
नागपूरला सुरू आहेत उपचार - या घटनेत योगेश घारड यांच्या कमरेला गोळी लागली असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना शनिवारी रात्रीच नागपूरला हलविण्यात आले असून, नागपूर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
एकास अटक दुसऱ्याचा शोध सुरू - शिवसेनेचे उपशहरप्रमुख योगेश घारड यांच्यावर गोळीबार करणाऱ्या राजू तडस यास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, अटक केलेल्या आरोपींकडून पोलीस कसून चौकशी करीत आहे. योगेश घारड यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने वरुड शहरात शांतता ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा - Shivsainik Returned : राणा दाम्पत्याला अटक, अमरावतीतील राणांच्या घरासमोरून शिवसैनिक परतले