अमरावती - मेळघाटातील अतिदुर्गम भागात वेळेवर औषधोपचार तसेच वैद्यकीय मदत मिळावी यासाठी तीन बाइक ॲम्ब्युलन्स अमरावती शहरात दाखल झाल्या आहेत. या तिन्ही बाइक ॲम्ब्युलन्स लवकरच मेळघाटात रुग्णसेवेसाठी धावणार आहेत.
हेही वाचा - काय आहे मेळघाटातील कोरोना परिस्थिती ? सांगत आहेत डॉ. रवींद्र कोल्हे या विशेष मुलाखतीतून
- अशी आहे बाइक ॲम्ब्युलन्स
मेळघाटातील दुर्गम भागातील गर्भवती महिला, लहान मुलं तसेच सर्पदंश यासह इतर गंभीर आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत त्वरित पोहोचवून त्यांना उपचार मिळावे यासाठी ही ॲम्ब्युलन्स महत्त्वाची ठरणार आहे. बाइकला ट्रॉली जोडली आहे. या ट्रॉलीत रुग्णाला व्यवस्थितरीत्या झोपवून बाइकद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा तालुका रुग्णालयापर्यंत नेण्याची व्यवस्था आहे. या ॲम्ब्युलन्समध्ये प्रथम उपचार पेटीची व्यवस्था आहे. रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडरही या ॲम्ब्युलन्समध्ये आहे. या ॲम्ब्युलन्सला सायरनही आहे. वॉकी टॉकीसुद्धा या ॲम्ब्युलन्समध्ये उपलब्ध आहे. रुग्णांवर प्रथमोपचार करणारे तज्ज्ञ तसेच मेळघाटातील खडतर मार्गातून ही ॲम्ब्युलन्स व्यवस्थितरित्या चालवणाऱ्या तज्ज्ञांची नियुक्ती या ॲम्ब्युलन्सवर केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
- अतिदुर्गम भागात उपयोगी ठरणार -
मेळघाटात धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यात एकूण 313 गावं आहेत. यापैकी अनेक गावं अतिशय दुर्गम भागात असून, त्या ठिकाणी वाहतुकीची कुठलीही व्यवस्था नाही. यातील काही गावांची लोकसंख्या ही 200 च्या आतच असून, एक ते दोन गावात तर केवळ नऊ ते दहाच स्थानिक रहिवासी आहेत. अशा बऱ्याच गावांमध्ये आरोग्य सुविधेसह अनेक सुविधा अद्यापही पोहोचल्या नाहीत. अशा परिस्थितीत या दुर्गम भागात या ॲम्ब्युलन्स उपयोगी ठरतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
- मेळघाटातील आरोग्याच्या समस्या -
मेळघाटात धारणी तालुक्यातील चाकर्दा, टितंबा तसेच चिखलदरा तालुक्यातील आवघड आणि गौरखेडा बाजार या चार ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव शासनाकडे सुमारे वीस वर्षापासून सादर केला आहे. अद्यापही या भागात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाले नाही. मेळघाटात वैद्यकीय अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांनाही निवासाची व्यवस्था उपलब्ध नाही. यामुळे या भागात आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. असे असताना अतिशय विस्तीर्ण आणि दुर्गम परिसरात केवळ तीन बाइक ॲम्ब्युलन्सवर प्रचंड ताण येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - धक्कादायक : मेळघाटात तीन महिन्यांत तब्बल 49 बालकांचा मृत्यू