अमरावती : बिहार येथील व्यापाऱ्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना काल (24 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास नांदगाव पेठ शिवारात उघडकीस आली. स्थानिक गजानन साखरवाडे यांच्या शेतातील विहिरीच्या पायथ्याशी शेतमालकाला हा मृतदेह आढळून आला. घटनेतील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. राकेश कुमार रामदास पासवान (जिल्हा-पाटणा, बिहार) असे हत्या झालेल्याचे नाव आहे.
राकेश कुमारची कार चिखलात फसली
नांदगाव पेठ पोलिसांना दूरध्वनीद्वारे माहिती मिळाली की एक बेवारस कार दोन दिवसांपासून चिखलात फसलेली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून बेवारस वाहनाची पाहणी केली. तेथून हाकेच्या अंतरावर साखरवाडे यांच्या विहिरीच्या पायथ्याशी राकेश कुमारचा कुजलेला मृतदेह देखील आढळला. दरम्यान, मृतकाचे चारचाकी वाहन चिखलात फसले होते. घटनेच्या वेळी राकेश कुमार स्वत: स्टेअरिंगवर बसले होते. तर एक जण कारला धक्का मारत होता, अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
राकेश कुमारच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह विहिरीत ढकलण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला. परंतु वजन जास्त असल्याने मृतदेह विहिरीवरच सोडून आरोपी तेथून पसार झाला, असावा अशी प्राथमिक माहिती हाती लागली आहे. तर राकेश कुमार गुजरात येथे वास्तव्यास होता. तो दर दोन महिन्यांनी अमरावती मार्गे लालगंज येथील कुटुंबीय आणि शेती बघण्यासाठी वाहनाने जायाचा, अशी पोलिसांनी माहिती दिली आहे. वाहनात कोण-कोण होते? महामार्ग सोडून ते वाहन अडगळीच्या मार्गाने कुठे निघाले होते? हत्येचे नेमके कारण काय? अशा अनेक प्रश्नांनी पोलिसांना संभ्रमात टाकले आहे. या खुनाच्या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
हेही वाचा - नारायण राणेंचं संरक्षण काढा, घरात घुसून कोथळा बाहेर काढतो; आमदार संतोष बांगर यांचं वादग्रस्त वक्तव्य