अमरावती: शिलाई मशीन प्रशिक्षण व गारमेंट्सचा व्यवसाय सुरू करण्याकरिता ना- हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी एका महिलेकडून २० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या भातकुली नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई शुक्रवारी शहरातील न्यू महालक्ष्मीनगर येथे करण्यात आली.
50 हजार रुपयांची केली होती मागणी: करिश्मा सतीश वैद्य (२७) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर मुख्याधिकाऱ्यांचे नाव आहे. भातकुली येथील दुकानामध्ये शिलाई मशीन प्रशिक्षण व गारमेंट्सचा व्यवसाय सुरू करण्याकरिता ना- हरकत प्रमाणपत्रासाठी एका महिलेने नगरपंचायतीकडे अर्ज केला होता. त्यावर ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी मुख्याधिकारी करिश्मा वैद्य यांनी सदर महिलेकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यासंदर्भात महिलेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न: तक्रारीच्या अनुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली. पडताळणीत मुख्याधिकारी करिश्मा वैद्य यांनी ५० हजारांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी २० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज शुक्रवारी सापळा रचण्यात आला. मुख्याधिकारी करिश्मा वैद्य यांनी सदर महिलेला लाचेची २० हजारांची रक्कम घेऊन घरी बोलावून ती स्वीकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात अटक केली.
खोलपुरी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल: या प्रकरणात मुख्याधिकारी करिश्मा वैद्य यांच्याविरुद्ध खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत व देविदास घेवारे, उपअधीक्षक एस. एस. भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील व केतन मांजरे, माधुरी साबळे, विनोद कुंजाम, युवराज राठोड, राहुल वंजारी, गोवर्धन नाईक आदींनी केली.