अमरावती - जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघाच्या शिवसेना भाजप युतीच्या उमेदवार प्रिती बंड यांच्या प्रचारासाठी आज(रविवारी) अभिनेता व चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे यांनी नागपुरी गेट परिसरातून पदयात्रा काढली. यावेळी कुठल्याही आमिषाला बळी न पडता प्रिती बंड यांच्या रूपाने नवी एनर्जी मतदार संघात आणावी, असे आवाहन भारत गणेशपुरे यांनी मतदारांना केले.
बडनेरा मतदारसंघात उमेदवार प्रिती बंड यांच्या प्रचारासाठी रविवारी दिवसभर विविध भागांमध्ये प्रचार सुरू आहे. अभिनेता भारत गणेशपुरे हे प्रिती बंड, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य आणि नगरसेवक तुषार भारतीय यांच्यासह पदयात्रा काढून प्रचार करीत आहे. बडनेरा मतदारसंघात गेल्या १० वर्षांपासून जनता आमिषाला बळी पडून विकासापासून दूर गेली आहे. त्यामुळे, आता बडनेरा मतदारसंघाच्या विकासासाठी प्रिती बंड यांना निवडून द्यावे असे मतदारांना आवहान करत असल्याचे गणेशपुरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
हेही वाचा - बडनेरा मतदारसंघात भारत गणेशपुरे विरुद्ध बिग बॉस शिव ठाकरे!
दिवंगत संजय बंड वलगाव मतदारसंघात आमदार असताना त्यांनी या मतदारसंघात अनेक विकासात्मक कामे केली. आज संजय बंड आपल्यात नसले तरी त्यांच्या रूपाने प्रीती बंड यांच्या माध्यमातून बडनेरा मतदारसंघाचा विकास करण्याची एक संधी आहे. त्यामुळे आता मतदारांनी चुकीच्या प्रवृत्तीला बळी न पडता प्रीती बंद यांना बहुमताने निवडून द्यावे असे गणेशपुरे म्हणाले.
हेही वाचा - हाफ मॅरेथॉन स्पर्धेत धावले हजारो अमरावतीकर, केनियाचा रोनाल्डो किबीओटने मारली बाजी