अमरावती - अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असताना आता दिवाळी असतानाही राज्य शासन शेतकऱ्यांच्या अडचणींची दखल घेत नाही, असा आरोप करत शुक्रवारी भाजपा नेते आणि माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात बेसन भाकरी आंदोलन करण्यात आले. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर हे आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आंदोलकांनी खाल्ली बेसन भाकर -
दिवाळी आहे तर गोड खा, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. मात्र, हातात पैसा नसल्याने शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या नशिबात दिवाळीतही बेसन भाकर खावी लागत असल्याने, आम्हीसुद्धा आज बेसन भाकरी खाऊन शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत आहोत. तसेच महाराष्ट्र शासनाचा निषेध नोंदवितो, असे डॉ. अनिल बोंडे यावेळी म्हणाले.
निवासी आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनाही दिली बेसन-भाकर
जिल्हाधिकारी शैलेश नवाल हे अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसंदर्भात विभागीय आयुक्तालयात आयोजित बैठकीसाठी गेले होते. यामुळे आंदोलकांनी निवासी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे आणि अप्पर जिल्हाधिकारी सिद्धभट्टी यांना बेसन भाकर भेट दिली.
या आंदोलनात डॉ. अनिल बोंडे यांच्यासह भाजपा प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, प्रा. रवींद्र खांडेकर, ललित समदूरकर आदी सहभागी होते.
हेही वाचा - शेतकरी प्रश्न : आमदार रवी राणांचे राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन
सरकारने जाहीर केलीय मदत -
गेल्या महिन्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात मदत मिळायला उशीर होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्यानंतर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले होते. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून २ हजार २९७ कोटी रुपयांचा पहिला हफ्ता संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे.
सरकारच्या मदतीवर राजू शेट्टी समाधाना, पण...
अतिवृष्टीसाठी राज्य सरकारने 10 हजार कोटींची मदत जाहीर केली याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्वागत केले आहे. मात्र, जाहीर केलेली ही मदत झालेल्या नुकसानापेक्षा अपुरी आहे, एवढ्याने शेतकऱ्यांचे समाधान होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने आता केंद्राकडे अधिक मदतीसाठी पाठपुरावा करावा आणि राज्यातील विरोधी पक्षानेसुद्धा त्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
पीक नुकसानापोटी विभागनिहाय मदत -
- विदर्भ - ५६६ कोटी रुपये
- मराठवाडा - २ हजार ६३९ कोटी रुपये
- नाशिक - ४५० कोटी रुपये
- पुणे - ७२१ कोटी रुपये
- कोकण - १०४ कोटी रुपये