अमरावती Bear on Tree : मेळघाटात वाघांपेक्षाही अधिक संख्येने अगदी बिबट्याच्या बरोबरीने अस्वलाची संख्या वाढत आहे. (Bears News) जंगलात फिरताना अनेक मोठ्या झाडांवर काही खुणा आढळल्या आहेत. या खुणा झाडांवरील नैसर्गिक रेषांप्रमाणे भासत आहेत. परंतु, त्यांना निरखून पाहिले तर त्या मादी अस्वलाच्या नख्यांच्या खुणा असल्याचं लक्षात येतं. ( Free Movement Bear In Melghat )
मध खाण्यासाठी अस्वल चढतात झाडावर : अस्वल हा प्राणी भारतात सर्वच जंगलात आढळतो. ( Bear Climbed On Tree) देशात अस्वलाच्या एकूण चार प्रजाती आहेत. मेळघाटातील पानगळतीच्या जंगलामध्ये मिश्र आहारी मादी अस्वलींचं मोठ्या संख्येनं वास्तव्य आहे. अस्वल हा मुंग्या, उधळी, फळ, मोहाची फुलं खाऊन उदरनिर्वाह करणारा प्राणी आहे. मध हे मादी अस्वलांचं अत्यंत आवडीचं खाद्य आहे. उंच झाडांवर असणाऱ्या मधाचं पोळं फोडून ते खाण्यासाठी मादी अस्वल झाडांवर चढण्यात पटाईत असतात. मेळघाटात अर्जुन, कहू, वड, आंबा, सागवान या झाडांवर असणारी मधाची पोळी फोडून त्यातील मध खाण्यासाठी मादी अस्वल या झाडांवर चढतात. (Bear on Tree Melghat )
झाडांवर नक्षीदार खुणा : नदी काठावरील झाडांवर मधमाशांची पोळी असतात. यामुळे नदीच्या परिसरात मादी अस्वलाचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य असतं. मध खाण्यासाठी अस्वल झाडावर आपल्या नखांच्या साह्याने चढतात. उतरताना देखील नखांचा आधार घेतात. मादी अस्वल झाडावर चढताना नखांच्या ओरबड्यामुळे झाडावर ज्या खुणा उमटतात त्यापेक्षा अगदी वेगळ्या स्वरूपाच्या खुणा झाडावरून खाली उतरताना झाडाच्या खोडावर उमटतात. मादी अस्वलाच्या नखांमुळे आगळीवेगळी आकृती झाडाच्या खोडावर तयार होते. नवख्या व्यक्तीला झाडावरील या रेषा नैसर्गिकच वाटतात. मात्र झाडाच्या खोडावरील या अतिशय नक्षीदार खुणा या परिसरात मादी अस्वल असल्याच्या सूचक आहेत, अशी माहिती परिसरातील रहिवासी चिंद्या हरसुले यांनी दिली.
मोह फुलांमुळे अस्वल आणि मनुष्य संघर्ष : उन्हाळ्यात मेळघाटच्या जंगलातील सर्व झाडांची पानं गळून पडतात. उन्हाळ्यात सर्वत्र आढळणाऱ्या मोहाच्या झाडाला बहर येतो. मोहाचे फुल हे मादी अस्वलाला आवडते. यामुळे मोहाच्या झाडाखाली मादी अस्वल नेहमीच येतात. याच दिवसात मेळघाटात असणाऱ्या कोरकू जमातीचे लोक मोह फुले जमा करण्यासाठी जंगलात येतात. फुलांसाठी अस्वल आणि मनुष्य बरेचदा समोरासमोर येत असल्यामुळे, मनुष्यावर अस्वलाने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.
अस्वलीमुळे 2010 ला हादरले होते मेळघाट : मेळघाटच्या जंगलात वाघ आणि बिबट्यापेक्षाही मादी अस्वल हे अतिशय धोकादायक आहे. 4 ऑगस्ट 2010 रोजी मेघाटातील चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या जारीदा गावात मादी अस्वलाने हल्ला करून एकूण चार जणांना ठार मारले होते. वनरक्षक म्हणून सेवा देण्यासाठी पहिल्यांदाच जारीदा गावात पोहोचलेले अभिषेक वाकोडे यांच्यासह, आश्रम शाळेतील उपमुख्याध्यापक आर. बी. थकाते, विद्यार्थी संतोष सावलकर आणि गुराखी सदू बुडा पराते या चार जणांना मादी अस्वलाने हल्ला करून ठार मारले होते.
पोहरा सोडून लगतच्या सर्वच जंगलात अस्वलीचा वास : सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटात मादी अस्वल मोठ्या संख्येत आहेत. यासह अमरावती जिल्हा आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असणाऱ्या सातपुडा पर्वत रांगेतील, बहिरम आणि मुक्तागिरी या धार्मिक स्थळाच्या परिसरात देखील मोठ्या संख्येत अस्वलांचा वावर आहे. जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यालगत येणाऱ्या सालबर्डीच्या जंगलात देखील अस्वल आहेत. जिल्ह्यात मेळघाटानंतर सर्वात मोठे जंगल म्हणून ओळखला जाणाऱ्या पोहरा जंगलात मात्र कुठेही अस्वल आढळत नाही. पोहराचं जंगल हे अमरावती शहराला लागून आहे. तसंच चांदुर रेल्वे या शहरासह पोहरा, भानखेडा, कारला शिरोडी, अशी अनेक गावं या जंगलाला लागून आहेत. या ठिकाणी कधीही अस्वल आढळून आले नाहीत. परंतु या जंगलात बिबट्यांची संख्या मात्र जास्त आहे.
हेही वाचा -