अमरावती - सावरखेड येथील पंकज डाहे हा युवक मंगळवारी (२ जुलै) सावरखेड आणि कामुंजा गावालगत असणाऱ्या नदीत मासे पकडत असताना त्याच्यावर कामुंजा येथील बनसोड कुटुंबीयांनी अचानक हल्ला केला. आपल्या मुलाला मारहाण होत असल्याचे कळताच डाहे कुटुंबातील सदस्य त्याच्या बचावासाठी धावून आले त्यांच्यावरही कुऱ्हाडीने हल्ला चढविण्यात आला. या घटनेत डाहे कुटुंबातील ६ जण गंभीर जखमी झाले. पंकज डाहे, पवन डाहे, विजय डाहे,बाळू डाहे, लक्ष्मण पारीसे आणि रजनी गजानन डाहे, असे हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत.जखमींवर अमरावती उपचार सुरू आहेत.
तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर सावरखेड गावात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी कामुंजा येथील बनसोड कुटुंबीयांची पाठराखण केल्याचा आरोप सावरखेडवासी करीत आहेत. पंकज हा मंगळवारी नदीवर मासे पकडायला गेला होता. त्यावेळी आमच्या गावाजवळ तू का आला, असा सवाल करीत कामुंजा येथील साहेबराव बनसोड, माणिक बनसोड, मनीष बनसोड आणि श्रीकांत बनसोड यांनी पंकजवर लाठ्या काठयांनी हल्ला केला. पकंजवर हल्ला झाल्याचे कळताच पवन डाहे, बाळू डाहे, लक्ष्मण पारिसे आणि रजनी गजानन डाहे हे त्याच्या बचावासाठी धावून आलेत. दरम्यान बनसोड कुटुंबीयांनी पंकजला सोडविण्यासाठी आलेल्या सर्वांवर कुऱ्हाड आणि काठीने मारहाण केली. या हल्ल्यात लक्ष्मण पारीसे गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर सर्व जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कामुंजा गावातील लोकांची धरणात जमीन गेल्याने त्यांच्याकडे भरपूर पैसा असल्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप सावरखेडमधील नागरिकांनी केला. मंगळवारी घटना घडल्यावर पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. तसेच इतक्या गंभीर प्रकरणात हल्लेखोरांवर हव्या त्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले नाहीत. आरोपी त्यामुळे आजही सर्रासपणे गावात खुलेआम फिरताना दिसत असून पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. त्यामुळे पोलिसांनी कुठलाही भेदभाव न करता कायद्याची योग्य अंमलबजावणी करुन दोषींना त्वरित अटक करावी, अशी मागणी सावरखेडवासीयांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केली.