अमरावती - बहिरमची यात्रा ही विदर्भातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. अमरावती जिल्ह्यातील या यात्रेत मातीच्या हंडीत मटण शिजवण्याची प्रथा आहे. मातीच्या भांड्यात शिजवलेले लज्जतदार, झणझणीत मटण आणि त्यासोबत रोडग्यांवर ताव मारण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी बहिरमच्या यात्रेत उसळते.
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरीवल सातपुडा पर्वतरांगेतील चांदुरबाजार येथे बहिरमची यात्रा भरते. दरवर्षी 20 डिसेंबर ते 30 जानेवारीपर्यंत ही यात्रा चालते. पूर्वी येथील बहिरम बाबांना बकरे आणि कोंबड्यांचा बळी देण्याची प्रथा होती. यात्रेदरम्यान मंदिराच्या पायर्यांवरुन प्राण्यांच्या रक्ताचे पाट वाहत असत. त्यामुळे आता बहिरम बाबा मंदिरात प्राण्यांचे बळी देण्याची प्रथा बंद करण्यात आली आहे. बहिरम बाबांना मटनाच्या नैवेद्याची प्रथा बंद झाली असली तरी मातीच्या हंडीत शिजणार्या मटणावर ताव मारणाऱ्यांची परंपरा मात्र कायम आहे. यात्रेत मातीने बनविलेल्या विशिष्ट हंडीमध्ये मटण शिजविले जाते. यात्रेत येणारे खवय्ये मटण विकत घेतात आणि मटन बनविणाऱ्यांकडून चूलीवरील मातीच्या हंडीमध्ये ते तयार करून घेतल्या जाते. एका किलोमागे तीनशे रुपये याप्रमाणे मातीच्या हंडीत मटन शिजवण्यासाठी पैसे घेतले जातात. यात्रेत जवळपास 30 ते 40 मातीच्या हंडीत मटन बनविणारी तात्पुरते हॉटेल्स थाटली जातात.
1जानेवारीपासून ही यात्रा बहरते. सध्या मातीच्या हंडीमध्ये मटन तयार करून देणारी अनेक हॉटेलचालक याठिकाणी तयारीला लागले आहेत. याठिकाणी मातीच्या चुली साकारून त्या चुलींची विधिवत पूजा केली जाते. मातीच्या हंडीचीही पूजा केल्यानंतर त्यात मटण शिजवण्यात येते. त्यानंतर जमिनीवरच बसून मटणावर ताव मारण्यात येतो. विशेष म्हणजे, मटणासोबत खाण्यासाठी 'रोडगे' असतात. त्यामुळे चुलीवरील मातीच्या भांड्यातील झणझणीत मटण आणि त्याच्यासोबतील रोडगे खाण्यासाठी खवय्याची याठिकाणी चांगलीच चंगळ पहायला मिळते. मटन शिजविण्याकरिता मातीची हंडीही विकत मिळते. दरवर्षी मातीच्या 25 ते 30 हजार हंडींची विक्री होत असल्याची माहिती मातीच्या हंडी विक्रेत्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. अनेकजण तर या यात्रेतून मातीची हंडी विकत घेऊन स्वतः जंगल परिसरात शेणाच्या गावऱ्या आणि लाकडे गोळा करून मटन शिजवितात. एकूणच थंडीच्या दिवसात बहिरमची यात्रा ही मटन खाणाऱ्या शौकिनांसाठी खास पर्वणीच असते.