अमरावती - राज्य सरकार सध्या इयत्ता पहिली, दुसरी आणि तिसरीची ऑनलाइन शाळा सुरू करू नका असे सांगत आहे. तरीही काही शाळा केवळ पालकांकडून फी घेण्यासाठी ऑनलाइन वर्ग चालवत आहे. ज्या शाळांनी फी घेण्यासाठी ऑनलाइन शाळा सुरू केली आहे, अशा शाळांवर थेट कारवाई करण्याचा इशारा शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला.
आज अमरावती येथे विभागातील पाचही जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आगामी शिक्षण प्रणालीबद्दल एक आढावा बैठक पार पडली. या आढावा बैठकीला शिक्षण उपसंचालक पेंदोर, सहाय्यक संचालक तेजराव काळे, प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे प्राचार्य डॉ. रवींद्र अंबेकर व विभागातील पाचही जिल्हातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनंतर ई टिव्ही भारतशी बोलताना शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, अमरावती विभागातील १ लाख १९ हजार विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोनच नाहीच. ऑनलाइन शिक्षणाची कुठलीही व्यवस्था नाही, अशा विद्यार्थ्यांनासाठी काय उपाययोजना करता येईल यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. शहरात राहणाऱ्या श्रीमंतांकडे मोबाईल आहे मात्र, ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणप्रणालीत हे विद्यार्थी मागे राहणार नाही याचा विचार केला गेला पाहिजे. या विद्यार्थ्यांसाठी वेळप्रसंगी शासन निर्णयसुद्धा बदलण्याचा प्रयत्न करू, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
२१ तारखेला अमरावती विभागात प्रत्येक तालुक्यातील पाचवीचा वर्ग ऑनलाइन पद्धतीने सुरू केला जाणार आहे. या विद्यार्थ्यांना 1 तास शिकवले जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावातील ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच त्या विद्यार्थ्यांना प्रश्न देतील. यातून विद्यार्थ्यांना एका तासाच्या ऑनलाइन वर्गात काय अवगत झाले? त्यांचा फायदा होत आहे की नाही? हे तपासले जाईल. त्यानंतर ५ ऑगस्टला १० वीचा वर्ग सुरू करण्याची तयारी करत असल्याचे कडू यांनी सांगितले. राज्यमंत्री म्हणून अमरावती विभागात ५ ऑगस्टला प्रत्येक तालुक्यात १० -१२ वी चे वर्ग सुरू करण्याची तयारी करत आहे, असेही कडू म्हणाले.