अमरावती - अनेक आगळ्या-वेगळया प्रकारच्या आंदोलनांनी सरकारला जेरीस आणणारे प्रहारचे आमदार बच्चू कडू हे सातत्याने चर्चेत राहतात. सध्या राज्यभरात उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च होत आहे. मात्र, बच्चू कडू यांनी रक्तदान करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन दिवसांपूर्वी अमरावतीच्या परतवाडा शहरात घडलेल्या खुनाच्या घटनेमुळे शहरात तणाव आहे. आपल्या शहरात शांतता नांदावी यासाठी रक्तदान करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी घेतला आहे. तसेच रॅलीही रद्द करण्यात आली असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. शुक्रवारी चार तारखेला ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
हेही वाचा - अमरावतीच्या परतवाडा शहरात तरुणाने साकारली २५ फुटाची महात्मा गांधींची रांगोळी
परतवाडा शहरात जुगाराच्या खेळातील वादातून एकाची हत्या करण्यात आली. त्यानंतर शहरात तणाव वाढला, याच तणावातून आणखी दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाकडून शहरात संचार बंदी लागू करण्यात आली होती.