अमरावती - शुल्क भरले नाही म्हणून महाविद्यालय प्रशासनाने परीक्षेला बसू दिले नाही. त्यामुळे तणावात आलेल्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बडनेरा येथे घडली आहे. अनिकेत अशोक निरगुडवार असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो बडनेरा येथील वसुधा देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी येथील बी.टेक अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. या घटनेमुळे बडनेरा खळबळ उडाली असून त्याच्या नातेवाईकांसह परिसरातील अनेक नागरिक महाविद्यालय प्रशासनाविरोधात कारवाई व्हावी, यासाठी बडनेरा पोलीस ठाण्यात धडकले आहेत. साईनगर परिसरातील अनुराधा कॉलनी येथील भाड्याच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
असे आहे संपूर्ण प्रकरण - यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तहसील अंतर्गत येणाऱ्या रिधोरा या गावातील अनिकेत निरगुडवार असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. बडनेरा पासून काही अंतरावर असणाऱ्या पाळा या गावातील वसुधाताई देशमुख फूड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात बीटेक चा अंतिम वर्षाचा तो विद्यार्थी होता. गुरुवारी अंतिम वर्षाची परीक्षा सुरू झाल्याने अनिकेत परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयात आला होता. परीक्षा सुरू असतानाच महाविद्यालयातील एका प्राध्यापिकेने त्याचा पेपर हिसकावला, अशी माहिती अनिकेत चे वडील अशोक निरगुडवार यांनी दिली. 17 हजार रुपये शुल्क भरले नसल्यामुळे तुला परीक्षा देता येणार नाही असे कारण प्राध्यापिकेने अनिकेतला सांगितले. परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे अनिकेत खचला होता. याबाबत त्याने सायंकाळी घरी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून वडिलांना झाला प्रकार सांगितला होता. अनिकेतच्या वडिलांनी त्याला धीर देत आपण पैसे भरून टाकू काळजी करू नको असे सांगितले. मात्र रात्री 10 वाजेच्या सुमारास अनिकेतने तो राहत असणाऱ्या साईनगर परीसरातील भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली, असेही अशोक निरगुडवार म्हणाले.
महाविद्यालय विरोधात तक्रार नाही - दरम्यान अनिकेतच्या वडिलांनी बडनेरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत मुलाने आत्महत्या केली केली असून याबाबत तपास करावा, अशी तक्रार दिली असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबाराव भावसार यांनी दिली. या तक्रारीत महाविद्यालयाने पेपर हिसकल्या संदर्भात कुठलाही उल्लेख नसल्याचे पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांनी स्पष्ट केले.
अनिकेतने पेपर सोडवला होता - अनिकेतला पेपर देऊ देण्यात आला नाही हा आरोप चुकीचा आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच क्लिअरन्स करण्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते. अनिकेतने माझ्याकडे सध्या पैसे नसल्यामुळे मी सोमवारी क्लिअरन्स करणार असे सांगितल्यावर त्याच्यासह सर्वच विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. अनिकेतने संपूर्ण पेपर सोडवला होता. सहा महिन्यानंतर पहिल्यांदाच अनिकेत कॉलेजला आला होता, अशी माहिती महाविद्यालयातील प्राध्यपिका योगिता सव्वालाखे यांनी दिली.