अमरावती - शेतकऱ्यांची कामे सुरळीतपणे व्हावित यासाठी ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहायक यांची संयुक्त यंत्रणा गाव पातळीवर कार्यान्वित केली आहे. कृषी सहायकांसाठी ग्राम पंचायतीत बसण्याची व्यवस्था करण्यात आल्याने शेतकऱ्यांना कृषी सहायक सहज उपलब्ध होत आहेत. येत्या काही दिवसांत कृषी सहायकांसाठी अटेंडन्स ट्रॅकिंगची व्यवस्थाही केली जाणार आहे.
या व्यवस्थेमुळे कृषी सहायक ग्राम पंचायतीत आला, की त्याच्या मोबाईल फोनवरच त्याला हजेरी भरावी लागेल आणि कार्यालय सोडतानाही मोबाईल फोनमध्ये तशी नोंद करावी लागणार असल्याची माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आज कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कामाचा आढावा घेतला. अकोला आणि अमरावती जिल्ह्याचा आढावा घेण्यापूर्वी कृषिमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला.
पंतप्रधान किसन सन्मान योजनेचे लाभ किमान 85 टक्के शेतकऱ्यांना मिळावा यासाठी आमच्यवतीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अमरावती विभागातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी संबंधित वैशिष्ट पाहून तेथे विशिष्ट प्रकल्प सुरू केले जाणार आहे. याच धरतीवर बुलडाणा जिल्ह्यात बीज उत्पादन प्रकल्प सुरू केला जाणार आहे.
कृषी अधिकाऱ्यांनी पीक कर्जासंदर्भात मेळावे आयोजित करून स्वतः उपस्थित राहण्याच्या सूचना आढावा बैठकीत दिल्या असल्याचे कृषिमंत्री म्हणाले. बोगस बी बियाणे, बनावट खते आदींबाबत कोणालाही माहिती मिळाली तर त्यांनी याबाबत त्वरित कृषी विभागाला माहिती द्यावी. आम्ही तडकाफडकी धाडी टाकून कारवाई करणार आहोत. कीडनाशक फवारणी करताना दुर्घटना घडू नये यासाठी दक्षता बाळगण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. काही कंपन्यांनी ट्रॅक्टरद्वारे माउंटेड स्प्रेइंगची तयारी दर्शविली असून या कंपन्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून एकरी 100 रुपये, या प्रमाणे फवारणी करून देतील असेही कृषिमंत्री म्हणाले.
कृषी विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कृषिसाठी शेतकऱ्यांसारखी मेहनत घ्यावी, आशा सूचना बैठकीत दिल्या असल्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे म्हणाले.