अमरावती - शासनाकडून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले जात असतानाच एकावेळी तब्बल १६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना शासनाच्याच रुग्णवाहिकेतून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे यात लहान बालके व वृद्धांचादेखील समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून हा आकडा आता चार हजारांच्या वर गेला आहे. ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळत आहे. बुधवारी चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा या गावात तब्बल १६ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या रुग्णांना चांदूर बाजार येथील कोविड रुग्णालयात उपचाराकरिता आणण्यासाठी गेलेल्या शासनाच्या १०८ रुग्णवाहिकेत क्षमतेपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना अक्षरक्ष: कोंबून आणण्यात आले. त्यामुळे नागरिकांना सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन करणाऱ्या प्रशासनालाच सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमांचा विसर पडल्याचे दिसत आहे.
दरम्यान, या १६ रुग्णांना चांदूर बाजार येथे रुग्णालयात आणल्यानंतर त्यातील चार कोरोना रुग्णांना उपचारासाठी अमरावती येथील पंजाबराव देशमुख रुग्णालयात नेण्यात आले. तसेच, चांदूर बाजार येथील कोविड रुग्णालयात डॉक्टरही उपलब्ध नसल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे.