अमरावती - महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेवर अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात 67 चौरस किलोमीटरपर्यंत पसरलेल्या महेंद्रीच्या जंगलात वनविभागाच्या वतीने प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे निर्माण केले आहेl. आता कडाक्याच्या उन्हात वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण होणार नाही अशी व्यवस्था या कृत्रिम पानवठ्यांमुळे घरात जंगलातच करण्यात आली आहे.
असे आहे महेंद्रीचे जंगल - जिल्ह्यातील महेंद्री जंगल हे अभयारण्य घोषित व्हावे यासाठी अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. 13 सप्टेंबर 2021 ला राज्य शासनाने महेंद्रला, महेंद्री संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित केले. एकूण 67 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या मेहंद्रीच्या जंगलात एकही गाव येत नाही. हा संपूर्ण परिसरात जंगलाने व्याप्त आहे. या जंगलाला अभयारण्य घोषित केल्यामुळे कुणीही बाधित होणार नाही. हे जंगल अभयारण्य घोषित झाले तर महेंद्र गावासह वरुड तालुक्यातील लगतच्या अनेक गावांना महेंद्री जंगलात पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून रोजगाराची नवी संधी प्राप्त होऊ शकते.
वाघांसह अनेक प्राण्यांचा अधिवास - महेंद्री जंगलात वाघासह बिबट अस्वल ,सांबर, चितळ हरण कोल्हा लांडगा रानकुत्रे अशा दुर्मीळ प्रजातीचे वन्यप्राणी आहेत. जंगलात 240 प्रकारचे पक्षी आणि 54 प्रकारचे फुलपाखरे आढळतात. कोळी अर्थात कातींचे एकूण 150 प्रजाती महेंद्रचे जंगल समृद्ध करतात. जंगलात 10 कृत्रिम पाणवठे बांधण्यात आले आहेत.
कडाक्याचे ऊन तापायला लागल्यामुळे महेंद्री जंगलात असणारे पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटायला लागले आहेत. उन्हाळ्यात जंगलात पाणी नसल्यामुळे वन्य प्राणी हे लगतच्या मानवी वस्तीत जाण्याची भीती टाळण्यासाठी तसेच वन्य प्राण्यांना जंगलातच पाणी उपलब्ध व्हावे याकरिता महेंद्री वनपरिक्षेत्राचे वनपाल भरत पळसपुरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक वनमजूर यांच्या मदतीने 10 पेक्षा अधिक कृत्रिम पाणवठे निर्माण केले आहेत. या पाणवठ्याच्या निर्मितीमुळे वन्यप्राणी गावालगतच्या परिसरात जात नसल्यामुळे मानव आणि वन्य प्राण्यांमधील संघर्ष टाळण्यात मोठी मदत झाली असल्याचे राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे ईटीव्ही भारत शी बोलताना सांगितले. या पाणवठ्यांमुळे वन्य प्राण्यांना आपली तृष्णातृप्ती करणे सहज सोपे झाले असून अशाच प्रकारचे पाणवठे अमरावती शहरालगत असणाऱ्या जंगल परिसरात देखील तयार करण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यायला हवा असे देखील यादव तरटे यांनी म्हटले आहे.
असे आहेत पाणवठे - महेंद्रीच्या जंगलात ज्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे त्याच भागात मोठ्या झाडाखाली मोठा खड्डा खोदून हे पाणवठे तयार करण्यात आले आहे. पानवठ्यांसाठींच्या या खड्ड्यात जाडसर कळ्या रंगाची पॉलिथिन टाकण्यात आली आहे. या सर्व पाणवठ्यांमध्ये सकाळी आणि सायंकाळी टँकरद्वारे वन कर्मचारी पाणी टाकतात. पहाटे आणि सायंकाळच्या सुमारास या पाणवठ्यांवर सांबर , हरण, माकड या प्राण्यांसह मोर आणि इतर पक्षी पाणी पिण्यासाठी येत आहेत. वाघ आणि बिबट हे संपूर्ण जंगल शांत झाल्यावर या पाणवठ्यांवर आपली तहान भागवण्यासाठी येत असल्याची माहिती देखील यादव तरटे यांनी दिली.