अमरावती - जाती-धर्माच्या भिंती तोडून बालमित्रांनी गावाशी बांधिलकी जोपासली आहे. या मित्रांनी कोरोनाच्या या महासंकटात दोन गावातील नागरिकांना होमिओपॅथी औषधाचे वाटप केले आहे.
चांदुर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड मित्रमंडळ नावाने व्हाट्सअॅप ग्रुप आहे. यावर मागील पाच वर्षांपासून हे सर्व मित्रमंडळी एकत्र आले आहेत. सध्या ते नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. यातील कोणी अभियंता, कृषी सहायक, प्राध्यापक तर कोणी व्यावसायिक आहे. मात्र, सर्वजण अजूनही संपर्कात आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावात एकत्र येणे शक्य नसल्याने सर्व मित्रांनी घरीबसून आपल्या इतर बालमित्रांना आपापल्या परीने सहकार्य केले. यातील काहींनी गरजेच्या वस्तू पाठविल्या तर काहींनी आर्थिक मदत केली.
कोविड संसर्गाचे तीव्र स्वरुप लक्षात घेऊन गावातील सर्व जाती धर्माच्या मित्रांनी एक निर्णय घेतला. त्यांनी आपल्या मित्रांसोबत मांजरखेड आणि बासलापूर गावातील गावकऱ्यांची सुरक्षा व्हावी म्हणून प्रतिकार क्षमता वाढविणाऱ्या आर्सेनिक अल्बम या औषधीचे वाटप केले. तब्बल 700 कुटुंबांना या होमिओपॅथी औषधीचे वाटप करण्यात आले आहे.
या कार्यासाठी रहाटगाव येथील डॉ.उज्वला टांक यांच्या मार्गदर्शनाखाली औषध तयार करण्यात आले. ते एका दिवसात सर्व गावकऱ्यांना वितरण करण्यात आले. सदर औषध घरोघरी पोहोचवण्यासाठी गावातील विपीन गुल्हाने, सौरभ कुंभलकर, निखिल चौकडे, संकेत सवाई, गजु गवयी, निलेश शिंगाणे, रोशन फोफसे, समीर सावंत, कृष्णा शिरभाते, प्रविण खोडके, सुरज खोडके, नितीन मोटघरे, राजु जाधव आदींनी परिश्रम घेतले.